Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:21 PM2024-11-05T12:21:58+5:302024-11-05T12:25:08+5:30
Maharashtra Assembly Election 2024 BJP Devayani Farande : मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे.
नाशिक - मध्य नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आणि मनसेचे जिल्हाप्रमुख अंकुश पवार यांच्यासह अन्य पक्षांच्या बंडखोरीच्या माघारीमुळे भाजपाच्या देवयानी फरांदे यांनाच फायदा होणार असल्याचे भाजपाच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
या मतदारसंघात प्रा. देवयानी फरांदे यांची महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी थेट लढत होत आहे. मात्र, महाविकास आघाडीतील बंडखोरीमुळे भाजपच्या उमेदवाराची मते त्यांना मिळतील त्यामुळे महाविकास आघाडीचा जातीय समीकरणामुळे फायदा होईल असे सांगितले जात होते. मात्र, आघाडीतील बंडखोरी टळल्याने जी मते विभागली जाणार होती ती भाजपाला मिळणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे.
मराठा समाजाच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र वसतिगृहासाठी प्रा. फरांदे यांनी शासनाकडून १५९ कोटींचा निधी मंजूर करुन आणला आहे. शहरातील त्र्यंबकरोड परिसरात तब्बल दहा मजली साकारणारे हे वसतिगृह गोरगरीब मराठा समाजासाठी वरदान ठरणार आहे. या वसतिगृहाच्या कामामुळे मराठा समाजाने आमदार फरांदे यांना अनुकूल भूमिका त्याचवेळी स्पष्ट केली होती. त्याचा फायदा फरांदे यांना होईल असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. शिवाय अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा महायुतीतील महत्त्वाचा पक्ष आहे. रंजन ठाकरे यांनी उमेदवारी केली असती तर महायुतीच्याच मतांचे विभाजन होऊ शकले असते. तेही टळले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अंकुश पवार यांनीही सोमवारी माघार घेतली. काही महिन्यांपासून भाजप आणि मनसे एकाच भूमिकेतून राजकीय पटलावर कामकाज करीत आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांची विभागणी टाळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते, त्यालाही यश मिळाल्याने फायदाच होणार असल्याचे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.