पक्षाकडून सातत्याने आश्वासने देऊन फसवणूक; उमेदवारी न मिळाल्याने भाजपा नेत्याचे बंडाचे निशाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2024 10:07 AM2024-10-23T10:07:35+5:302024-10-23T10:08:20+5:30
आता थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तरी थांबणार नाही, असे सांगत भाजपा नेत्याने बंडाचे निशाण फडकावले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, सातपूर : महानगरपालिकेचे स्थायी सभापतीपद, महापौरपद, लोकसभा, विधानसभा अशी आश्वासने भाजपाच्यावतीने देण्यात आली. मात्र सातत्याने फसवणूक करण्यात आली त्यामुळे त्यामुळे आता थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली तरी थांबणार नाही, असे सांगत भाजपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहेत.
नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक लढविणारच, असा निर्धार करीत अजूनही वेळ गेलेली नाही. आमदार सीमा हिरे यांची उमेदवारी रद्द करून आपल्याला द्यावी; अन्यथा भाजपाला परिणाम भोगावे लागतील, असे थेट आव्हानच भाजपाचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी दिले. आहे. नाशिक पश्चिम विधानसभा निवडणुकीत भाजपाने आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर नाराज झालेले आणि इच्छुक असलेले भाजपाचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी त्यांच्या प्रभागात निर्धार मेळावा घेतला.
जनार्दन काकडे, बाळासाहेब गुंजाळ, देवराम सैंदाने, संतोष तिवारी, मधुकर खांडबहाले, किशोर मुंदडा, हभप कवडे, मराठे, फारूकखान पठाण, दिलीप वाणी, नांनेकुमार यादव, डॉ. गाजरे आदिंसह समर्थक उपस्थित होते. माजी नगरसेविका वर्षा भालेराव यांनी यावेळी पक्षाने आमदार सीमा हिरे यांच्याऐवजी दिनकर पाटील यांनाच उमेदवारी दिली पाहिजे, अशी मागणी केली. प्रास्ताविक अमोल पाटील यांनी केले.