देवळालीत शिंदेसेना मैत्रीपूर्ण लढत देणार; हेमंत गोडसे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 01:17 PM2024-11-12T13:17:45+5:302024-11-12T13:18:30+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Hemant Godse : देवळाली मतदारसंघात महायुतीत आता मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या विरोधात शिंदेसेनेने राजश्री अहिरराव यांनी दाखल केलेला शिंदे सेनेचा अर्ज कायम आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Hemant Godse Deolali Assembly constituency | देवळालीत शिंदेसेना मैत्रीपूर्ण लढत देणार; हेमंत गोडसे यांची माहिती

देवळालीत शिंदेसेना मैत्रीपूर्ण लढत देणार; हेमंत गोडसे यांची माहिती

देवळाली मतदारसंघात महायुतीत आता मैत्रीपूर्ण लढत होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सरोज आहिरे यांच्या विरोधात शिंदेसेनेने राजश्री अहिरराव यांनी दाखल केलेला शिंदे सेनेचा अर्ज कायम आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी भूमिका स्पष्ट करेपर्यंत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतरही पक्षश्रेष्ठींनी कोणतीही भूमिका न घेतल्याने अखेरीस कार्यकर्ते पक्षचिन्ह टिकवण्यासाठी शिंदे सेनेच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी यासंदर्भात दुजोरा देताना मैत्रीपूर्ण लढत करत असल्याचे सांगितले. 

नांदगाव मतदारसंघात शिंदेसेनेचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी केल्याने शिंदेसेनेने दिंडोरीत धनराज महाले आणि देवळालीत राजश्री अहिरराव यांना एबी फॉर्म दिला होता. माघारीच्या अखेरच्या दिवशी धनराज महाले यांनी अर्ज मागे घेतला तरी अहिरराव या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात न आल्याने त्यांचा अर्ज आणि एबी फॉर्म कायम राहिला. 

दरम्यान, देवळालीत शिवसेनेचा तीस वर्षांपासून वरचष्मा असून त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह टिकवण्यासाठी ही निवडणूक लढवावी, असे मत कार्यकर्त्यांनी केले होते. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी हे मत जाणून घेतल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळवले होते. दोन दिवसांत त्यांचा निर्णय आल्यानंतर भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नाशिकला येऊन आढावा घेतला होता; परंतु त्यानंतरही पक्षाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता कार्यकर्ते शिंदेसेनेचा प्रचार करू लागल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले.

देवळाली मतदारसंघाबाबत काय भूमिका घ्यावी यासाठी पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावे असे ठरले होते. मात्र, नंतर कोणताही खुलासा झाला नाही. परिणामी, कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचे काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. 

- हेमंत गोडसे, माजी खासदार, शिंदेसेना
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Hemant Godse Deolali Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.