नाशिक परिक्षेत्रात ३४ कोटींचे दागिने हस्तगत; पोलिस यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर

By अझहर शेख | Published: November 9, 2024 07:04 PM2024-11-09T19:04:34+5:302024-11-09T19:19:08+5:30

विधानसभा निवडणुकीनिमित्त नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांची पोलिस यंत्रणा सतर्क

Maharashtra Assembly Election 2024 Jewelery worth 34 crore seized in Nashik area Police system on high alert | नाशिक परिक्षेत्रात ३४ कोटींचे दागिने हस्तगत; पोलिस यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर

नाशिक परिक्षेत्रात ३४ कोटींचे दागिने हस्तगत; पोलिस यंत्रणा ‘हाय अलर्ट’वर

नाशिक : आचारसंहिता कालावधीत नाशिक परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांत पोलिसांनी २६४ भरारी पथके तयार केली आहेत. आतापर्यंत ६ कोटी ५३ लाखांच्या रोकडसह एकूण ३४ कोटी रुपयांचे मौल्यवान दागिने व अन्य प्रलोभन वस्तू असा सुमारे ४९ कोटी ७ लाखांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त नाशिक ग्रामीण, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांची पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, नाशिक परिक्षेत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पाचही जिल्ह्यांच्या पोलिस अधीक्षकांची बैठक घेत निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष आराखडा तयार केला आहे. यानुसार पाचही जिल्ह्यांत चोख बंदोबस्त व सीमावर्ती भागात चार जिल्ह्यांना गुजरात व मध्य प्रदेश राज्यांची सीमा लागते. यामुळे कराळे यांनी या दोन्ही राज्यांच्या पोलिस महानिरीक्षक व अधीक्षकांसोबतही बैठक घेत ३४ मिरर चेक नाके व ३८ तपासणी नाके उभारले आहेत. दरम्यान, ५२ अग्निशस्त्रे, ८९ काडतुसे, १५३ अन्य घातक शस्त्रे तसेच ५ कोटी ७५ लाख रुपयांची अवैध दारू, २ कोटी ६७ लाखांचा गांजा व अन्य अमली पदार्थ नाशिक परिक्षेत्रात जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती कराळे यांनी नाशिक येथील त्यांच्या ‘दक्षता’ कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

चोरीला गेलेल्या एके-४७ रायफल जप्त

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे असलेल्या भारतीय सशस्त्र दलासाठीच्या गन पावडर व शस्त्रास्त्रे निर्मितीच्या कारखान्यांतून काही दिवसांपूर्वी शस्त्रगारातून तीन एके-४७ व ५.५६च्या दोन अशा एकूण पाच रायफल्स चोरीला गेल्या हाेत्या. एटीएसच्या मदतीने पोलिसांनी त्या बंदुका जप्त केल्या असून, एकाला अटकदेखील करण्यात आली आहे. यावेळी कुठल्याही प्रकारच्या काडतुसांची चाेरी झालेली नव्हती, असेही कराळे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Jewelery worth 34 crore seized in Nashik area Police system on high alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.