महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:43 PM2024-11-05T12:43:23+5:302024-11-05T12:43:53+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : सुरुवातीला नॉट रिचेबल आणि अखेरच्या वीस मिनिटांत शिंदेसेनेच्या धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा मार्ग मोकळा झाला.
नाशिक : सुरुवातीला नॉट रिचेबल आणि अखेरच्या वीस मिनिटांत शिंदेसेनेच्या धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांचा मार्ग मोकळा झाला. मात्र चांदवडमधून केदा आहेर ठाम राहिल्याने भाजपापुढील आव्हान वाढले आहे, तर इगतपुरीत निर्मला गावित यांनीदेखील उमेदवारी कायम ठेवल्याने महाविकास आघाडीपुढे पेच निर्माण झाला आहे. दुसरीकडे बागलाणमधील बंडखोरी थोपविण्यात भाजपला यश आल्याने साधना गवळी यांनी माघार घेतली. इतर बहुतेक मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे सरळ लढतीचे चित्र आहे. त्यामुळे आता प्रचाराचा धुराळा आणि आरोपांची राळ उठणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारीसाठी सोमवारी (दि.४) दिवसभर नाट्धमय घडामोडी सुरू होत्या. बंडखोरी झालेल्या दिंडोरी, चांदवड, नांदगाव आणि इगतपुरी मतदारसंघाकडे अधिक लक्ष होते. अर्ज माघारीच्या दिवशी दिंडोरीतील शिंदेसेनेचे उमेदवार धनराज महाले नॉटरिचेबल असल्याने अखेरपर्यंत त्यांच्या भूमिकेविषयी सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास वीस मिनिटांचा अवधी राहिला असताना त्यांनी प्रतिनिधी पाठवून माघार घेतली. त्यामुळे दिंडोरीतून नरहरी झिरवाळ यांना दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीतील संतोष रेहेरे यांची उमेदवारी कायम असल्याने येथे तिरंगी लढतीचे चित्र आहे.
केदा आहेर ठाम
चांदवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर केदा आहेर यांच्या लक्ष लागून होते. मात्र त्यांनी अखेरपर्यंत आपली भूमिका कायम ठेवल्याने त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न असफल ठरले. भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांचे फोन घेण्याचे देखील त्यांनी टाळल्याचे बोलले जात आहे. केदा आहेर हे देखील अज्ञातस्थळी असल्याची सुरुवातीला चर्चा होती. मात्र ते मतदारसंघातच असल्याचे सांगण्यात आले. त्यांची उमेदवारी कायम राहिल्याने डॉ. राहुल आहेर विरुद्ध केदा आहेर अशी लढत रंगणार आहे.
समीर भुजबळ कायम
नांदगाव मतदारसंघातून समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीत मिठाचा खडा पडल्याने भुजबळ यांच्या भूमिकेबाबत अनेक घडामोडी सुरू होत्या. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवशी भुजबळ नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून होते. मात्र भुजबळ यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने नांदगावमध्ये महायुतीतच लढत होणार आहे. शिंदेसेना आणि छगन भुजबळ यांच्यासाठी नांदगावची लढत प्रतिष्ठेची असल्याने आगामी काळात येथील प्रचारातही मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे दिसत आहे.
निर्मला गावितांच्या मनधरणीचे प्रयत्न असफल
इगतपुरी मतदारसंघातून माजी आमदार निर्मला गावित यांना समजविण्याचे महाविकास आघाडीचे सर्व प्रयत्न असफल ठरले. उद्धवसेना आणि काँग्रेसकडून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी नेत्यांच्या भेटी टाळल्याने मनसुबे स्पष्ट झाले. मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी त्या माधार घेऊ शकतात अशी चर्चा होती, तर इगतपुरीच्या स्थानिक ज्येष्ठ नेत्यांनी गावित यांना स्थानिक उमेदवार म्हणून पसंती असल्याचे सांगून त्यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा आग्रह धरल्याने त्यांनी स्थानिक मुद्यावर आपली उमेदवारी कायम ठेवल्याचे सांगितले जाते.
दराडेंची माघार
येवला मतदारसंघातून उद्धवसेनेचे कुणाल दराडे, राष्ट्रवादीचे बंडखोर जयदत्त होळकर यांनी माघार घेतल्याने येवल्यात छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे यांच्यात सरळ लढत होणार आहे. दराडे यांची समजूत काढण्यासाठी महाविकास आघाडीकडून करण्यात आलल्या प्रयत्नांना यश आले. यामध्ये उद्धवसेनेची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली.