दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 11:31 AM2024-11-22T11:31:49+5:302024-11-22T11:32:28+5:30

Maharashtra Assembly Election 2024 And Dindori Assembly constituency : दिंडोरी पेठ मतदारसंघाची निवडणूक असली तरी राज्यातील राजकारणाचा परिणाम या मतदारसंघावर होण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Assembly Election 2024 Narhari Zirwal sunita charoskar Nashik Dindori Assembly constituency | दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?

दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?

भगवान गायकवाड 

दिंडोरी - दिंडोरी पेठ मतदारसंघाची निवडणूक असली तरी राज्यातील राजकारणाचा परिणाम या मतदारसंघावर होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी या मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने कुणाला धक्का, कुणाला सत्ता मिळणार याविषयीची कमालीची उत्कंठा आहे. लोकसभा निवडणुकीत सुसाट सुटलेल्या तुतारीला घड्याळ ब्रेक मारत नरहरी झिरवाळ पुन्हा आमदार होणार की तुतारीच्या लाटेत सुनीता चारोस्कर पहिल्या आमदार होणार याची चर्चा तालुक्यात रंगत आहे.

विधानसभा निवडणूक प्रक्रियेपर्यंत विद्यमान आमदार हे शरद पवार गटाकडून लढणार की अजित पवारांसोबत राहणार याचा सस्पेन्स होता. त्यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी वारंवार इन्कार करीत घड्याळच हातात असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांच्या उमेदवारीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. झिरवाळ यांचे तिकीट फिक्स झाल्यानंतर शरद पवार गटाने माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी दिली. मात्र, यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक संतोष रेहरे, मधुकर भरसट, अशोक बागुल यांनी नाराज होत राष्ट्रवादीला रामराम केला. रेहरे व सुशीला चारोस्कर यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवले. सुशीला चारोस्कर यांनी जाहीर माघार घेत सुनीता चारोस्कर यांना साथ दिली. मात्र, त्यांचे नाव व पिपाणी निशाणी कायम राहिल्याने किती अडचण होते हे मतमोजणी नंतर कळणार आहे. 

रेहरे किती मते खेचतात यावरदेखील बरेच काही अवलंबून असणार आहे. झिरवाळ यांच्या विरुद्ध शिवसेनेने धनराज महाले यांना एबी फॉर्म दिला, मात्र त्यांची माघार मिळविण्यात झिरवाळ यांना यश आले. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना सुरू होताना आरोप प्रत्यारोप फैरी झडल्या. महाविकास आघाडीकडून महायुतीचे धोरणे व झिरवाळ यांनी शरद पवार यांची सोडलेली साथ अन् विकासकामे या मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न झाला तर महायुतीचे झिरवाळ यांनी विरोधक हे जातीचे राजकारण करीत असल्याचा आरोप करीत मोठी विकासकामे केल्याचे सांगत सरकारच्या लाडकी बहीण योजना, कृषी बिल माफी, एस. टी. बस सवलत, आदी योजनांच्या प्रसारावर भर दिला.

मतदारसंघात गेल्यावेळी पेक्षा तब्बल नऊ टक्के मतदान वाढले. यात महिला मतदारांचेही प्रमाण वाढले. पेठ तालुका अहिवंत वाडी, कसबे वणी गटात झिरवाळ यांनी आघाडी घेतल्याचा दावा केला जात आहे, तर कोचरगाव, उमराळे, मोहाडी खेडगाव गट व दिंडोरी येथील आघाडीवर चारोस्कर यांचे विजयाचे आखाडे बांधले जात आहे. ज्या गटात जो उमेदवार मोठी आघाडी घेईल ते विजयापर्यंत पोहोचतील असा कयास आहे. विधानसभा उपाध्यक्ष हे पुन्हा निवडून येत नाही हा इतिहास झिरवाळ पुसणार असा त्यांचे कार्यकर्त्यांना आत्मविश्वास आहे, तर पेठमध्ये झिरवाळ यांची आघाडी रोखत चारोस्कर पहिल्या आमदार होतील, अशी आशा महाविकास आघाडी समर्थकांना आहे.
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Narhari Zirwal sunita charoskar Nashik Dindori Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.