दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 02:53 PM2024-11-02T14:53:49+5:302024-11-02T14:55:12+5:30

Maharashtra Assembly Election 2024 Nashik : विधानसभा निवडणुकीसाठी अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यानंतर आता सर्व उमेदवार 'दिवळी मोड'वर आले असून, सोशल मीडियावर प्रचाराचे फटाके फुटण्यास प्रारंभ झाला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Nashik Assembly constituency Politics in diwali | दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी

दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी

नाशिक - विधानसभा निवडणुकीसाठी अर्जाची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली. त्यानंतर आता सर्व उमेदवार 'दिवळी मोड'वर आले असून, सोशल मीडियावर प्रचाराचे फटाके फुटण्यास प्रारंभ झाला आहे. असे असले तरी ४ नोव्हेंबरनंतरच राजकीय दिवाळी खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तोपर्यंत भेटीगाठी, दिवाळीच्या शुभेच्छा या माध्यमातून प्रचारावर जोर दिला जाणार आहे. 

मंगळवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांची दमछाक झाली. ज्येष्ठांची आणि वरिष्ठांची मनधरणी करण्यासाठी अनेकांनी मुंबई आणि दिल्लीपर्यंत वारी केली. 'फिल्डिंग' लावल्यानंतरही जागावाटप काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक मतदारसंघांमध्ये आयारामांना संधी मिळाली, तर डोळे लावून बसलेल्या अनेकांना ऐनवेळी डच्चू मिळाला. इतर पक्षांच्या हालचालींनंतर अखेरच्या क्षणी काही ठिकाणी उमेदवार देण्यात आले. दिंडोरी आणि मालेगाव मध्य हे दोन मतदारसंघ त्याचे उदाहरण म्हणता येईल. 

पक्षाने डावलल्याची भावना व्यक्त करत अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी अनेकांनी दर्शवली. आघाडीत युती असूनही काही ठिकाणी एबी फॉर्म देऊन मैत्रीपूर्ण लढतीसाठी काही मतदारसंघ वाटचाल करत असल्याचे दिसून आले. 

सध्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यासाठी आपापली गणिते जुळवण्यासाठी प्रयत्न होतील. त्यासाठी आतापासूनच नाराजांची मनधरणी करण्याचे काम सुरू झाले आहे. अर्ज मागे घेण्याची आणि दिवाळी संपण्याची तारीख एकच असल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीनंतर राजकीय दिवाळीला सुरुवात होईल. 

सध्या राजकीय नेत्यांची नावे घेऊन सुतळी बॉम्ब, फुसका फटाका, भुईचक्र अशी समीकरणे जुळवली जाताहेत. येत्या ४ नोव्हेंबरनंतरच खऱ्या अर्थाने कोणता फटाका किती आवाज करतो हे ठरेल आणि त्यानंतरच भेटीगाठी, प्रचार सभा, कॉर्नर बैठकींना रंगत येईल. 

भाऊबीजेचा मुहूर्त करणार कॅश 

शुक्रवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे सर्वजण 'दिवाली मोड'वर आहेत. त्यामुळे बहुतांश उमेदवारांना भाऊबीजेच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. रविवारी भाऊबीज असल्यामुळे लाडक्या बहिणींना शुभेच्छा देत आपला प्रचार करतील. अनेकांनी मतदारसंघात, वॉर्डामध्ये स्नेहमिलन सोहळेसुद्धा आयोजित केले असल्याचे समजते. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 Nashik Assembly constituency Politics in diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.