Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:25 PM2024-11-16T13:25:16+5:302024-11-16T13:25:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray : ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा शिवसेनेच्या गद्दारांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव व मनमाड येथे केले.
मालेगाव / मनमाड : ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा शिवसेनेच्या गद्दारांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव व मनमाड येथे केले.
मालेगाव बाह्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. शोभा बच्छाव, माजी मंत्री प्रशांत हिरे, डॉ. अपूर्व हिरे, सेना नेत्या शुभांगी पाटील, राजेंद्र भोसले, मध्यच्या उमेदवार शान ए हिंद उपस्थित होत्या.
ठाकरे यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका करून विकासकामांबात संशय व्यक्त केला. जिल्ह्यातील आमच्या काही पदाधिकाऱ्यांवर बळजबरीने खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. त्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मागे घेऊ.
तुमच्या आयुष्यात काळोख नको हवा असेल, तर तुम्हाला मशालीशिवाय पर्याय नाही!
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 15, 2024
११५- मालेगाव विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अद्वय हिरे ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी नागरिकांना संबोधित केले. pic.twitter.com/u0t52Z3zON
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या धोरणावर टीका केली. लाडक्या बहिणींना पैसे वाटून फार मोठे काम केलेले नाही, आधी बहिणींचा आदर करायला शिका, तुम्ही यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या असा सवाल उपस्थित केला. गद्दारांनी मतदारसंघाला कलंक लावला. तो दूर करा. माझ्याशी संबंध असल्याचे गद्दार सांगत असले तर सांगतो की, संबंध तोडले. एकाही गद्दाराला पुन्हा उमेदवारी दिलेली नाही. सूत्रसंचालन अॅड. सुधाकर मोरे यांनी केले.
तुरुंगात कांदे सोलायला पाठवू
मनमाड येथे नांदगाव मतदारसंघाचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत व्यासपीठावर कॉ. डी. एल. कऱ्हाड, माजी आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथराव धात्रक, शिवसेना आमदार मिलिंद नार्वेकर, जयंत दिंडे, योगिता गुप्ता उपस्थित होते. आपल्या भाषणात भावविवश होऊन अश्रू अनावर झालेल्या गणेश धात्रकांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, आता रडायचं नाही लढायचं, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यावर खोट्या केसेस मागे घेऊ, गद्दाराला तुरुंगात कांदा सोलण्यास पाठविल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, या गद्दाराने राज्यसभा निवडणुकीत सर्वप्रथम गद्दारी केली होती. गद्दाराला उमेदवारी देण्याचे पाप मी केले आहे, या पापाचे प्रायश्चित्त घेण्याची वेळ आली आहे, असे सांगून केंद्र सरकारच्या धोरणामुळे राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती खालावल्याचा आरोप केला दाखल केला आहे.