४० वर्षांनंतर देवळालीत मशालीवर निवडणूक; बबनराव घोलप यांनी लढवला होता किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 10:28 AM2024-10-30T10:28:22+5:302024-10-30T10:30:17+5:30
१९८५ मध्ये बबनराव घोलप यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेकडून मशाल निशाणीवर निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा तब्बल ४० वर्षांनंतर शिवसेनेकडून योगेश घोलप हे मशाल निशाणीवर नशीब आजमावत आहे.
मनोज मालपाणी, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक रोड : चाळीस वर्षांपूर्वी रोपटे असलेल्या शिवसेनेचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी मुंबई ठाणे पाठोपाठ शिवसेनेने नाशिकमध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. १९८५ मध्ये बबनराव घोलप यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेकडून मशाल निशाणीवर निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा तब्बल ४० वर्षांनंतर शिवसेनेकडून योगेश घोलप हे मशाल निशाणीवर नशीब आजमावत आहे.
१९६६ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर मुंबई ठाणेनंतर नाशिक जिल्ह्यात देवळालीगाव व भगूरमध्ये शिवसेनेची १९ जून १९६८ मध्ये स्थापना करण्यात आली. नाशिक रोड देवळालीगाव, भगुर भागातूनच शिवसेना नाशिक जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रात व औरंगाबाद (संभाजीनगर) मध्ये फोफावू लागली. शिवसेनेने मुंबई, ठाणे भागातील काही मतदार संघासोबत नाशिक व देवळाली विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १९८५ मध्ये पहिले जिल्हाप्रमुख (कै.) केशवराव थोरात यांनी नाशिक, तर राखीव देवळाली मतदारसंघातून बबनराव घोलप यांनी निवडणूक लढविली होती.
नाशिक शहरात शिवसेनेने लढविलेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत थोरात यांना २,७०० व घोलप यांना ३,२०० च्या आसपास मतदान झाले होते. शिवसेनेच्या घोलप यांनी चाळीस वर्षांपूर्वी लढविलेल्या पहिल्या निवडणुकीत मशाल निशाणी घेतली होती. पहिल्या निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवताना घोलप यांचा पराभव झाला असला, तरी १९९०च्या निवडणुकीत शिवसेनेकडून घोलप विजयी झाल्यानंतर सलग २५ वर्षे आमदार म्हणून निवडून आले.
१९९५ मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर घोलप यांना कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपदही मिळाले. त्यानंतर, धनुष्यबाण चिन्हावरच घोलप सतत निवडून आले. अपवाद फक्त १९९९ मधील निवडणुकीचा. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांमुळे शिवसेनेने उमेदवारी न देता घोलप यांना पुरस्कृत केले होते. त्यामुळे घोलप यांना अपक्ष उमेदवारी करावी लागली होती. त्यावेळी विमान चिन्हावर ते निवडून आले होते. दहा वर्षांपूर्वी घोलप यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी घातल्यानंतर त्यांचे पुत्र योगेश हे २०१४ मध्ये शिवसेनेकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आले. २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला.
अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत पडली फूट
अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर न्यायालयीन लढाईत शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी ही शिवसेनेच्या शिंदे गटाला देण्यात आली. त्यामुळे तब्बल ४० वर्षांनंतर घोलप यांचे पुत्र योगेश हे पुन्हा मशाल निवडणुकीवर निवडणुकीला सामोरे जात आहे.