राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 06:34 AM2024-10-26T06:34:26+5:302024-10-26T06:35:46+5:30
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: राजकारणात असलेल्या सर्वच पुतण्यांचा डीएनए एकसारखाच असल्याचे आता वाटते आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत भुजबळ कुटुंबीयांना कुणी अडचणीत आणू पाहत असेल तर त्याचा विचार करावा लागेल, अशा शब्दांत नांदगावमधूनसमीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले.
छगन भुजबळ यांचे पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून शिंदेसेनेचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला. यावर छगन भुजबळ शुक्रवारी येवला येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार यांचे पुतणे अजित पवार, अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे व बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे, अशा अनेक पुतणे कंपनीने आपल्या काकांचे ऐकलेच आहे, असे वाटत नाही. राजकारणात या पुतणे कंपनीचा डीएनए वेगळाच आहे.
‘ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात...’
- नांदगावमध्ये सुहास कांदे भुजबळ कुटुंबीयांवर खोटे आरोप करत आले आहेत. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयाला अडचणीतून जावे लागत आहे. महायुतीत असूनही कांदे यांनी आरोप चालवले आहेत. त्याचा भुजबळ कुटुंबीयांना कुठे तरी विचार करावा लागेल.
- समीर भुजबळ यांनी किती दिवस आता माझ्याकडे विचारणा करायची? त्यांचीही हाफ सेंच्युरी झालेली
- आहे. राजकारणात कुणाशी कसे लढायचे अथवा कुणाशी कसे जुळवून घ्यायचे, याचा राजकीय अभ्यास त्यांचा आहे. त्यामुळे ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात, असे सांगत भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे समीर भुजबळ यांच्या भूमिकेचे समर्थन केले.