राजकीय ईर्षा, कुटुंबात वैर भावना; खुद्द वडिलांनीच कन्येला पाठवली नाव न वापरण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 10:12 AM2024-10-31T10:12:34+5:302024-10-31T10:13:19+5:30

भावाला ठाकरे गटाची उमेदवारी, भाजपात गेलेल्या बहिणीचा थेट भावाविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाने टोक गाठले आणि पुत्र प्रेमापोटी खुद्द वडिलांनीच धाकट्या मुलीला नाव न वापरण्याची नोटीस पाठवली.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 babanrao gholap send notice to daughter tanuja gholap about not use family name in election | राजकीय ईर्षा, कुटुंबात वैर भावना; खुद्द वडिलांनीच कन्येला पाठवली नाव न वापरण्याची नोटीस

राजकीय ईर्षा, कुटुंबात वैर भावना; खुद्द वडिलांनीच कन्येला पाठवली नाव न वापरण्याची नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिकरोड : देवळाली मतदारसंघात माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुलाला आमदारकी व मोठ्या मुलीला महापौरपद मिळवून दिले. परंतु, धाकट्या मुलीच्या नशिबी दोन्हीही निवडणुकीत अपयश आले. राजकारणातील ईर्षेमुळे धाकट्या मुलीने भावाच्या विरोधातच आमदारकीला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अखेर वडील असलेल्या घोलप यांना लहान कन्येला नोटीस पाठवावी लागली आहे. लग्न झाले असल्याने माहेरचे नाव न वापरता सासरकडील नाव वापरावे, अशी जाहीर नोटीस देण्याची वेळ घोलप यांच्यावर आली आहे.

राजकारणातील ईर्षेमुळे रक्ताच्या संबंधातही कशी टोकाची परिस्थिती निर्माण होते, त्याची नोटीस हे ठळक उदाहरण ठरली आहे. देवळाली मतदार संघात व शिवसेनेतदेखील माजी मंत्री घोलप यांच्या नावाचा दबदबा आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आरोपांमुळे घोलपांना १९९९ मध्ये राजकीय ग्रहण लागले असतानादेखील त्यांनी डावपेच खेळत अपक्ष पुरस्कृत उमेदवारी करत यशाला गवसणी घातली.

त्यानंतर पुन्हा घोलपांनी दोन पंचवार्षिक निवडणुकीत यश मिळवत तब्बल २५ वर्ष आमदारकी भूषविली. दरम्यान, २००७ मध्ये घोलप यांनी मोठी मुलगी नयना वालझाडे-घोलप हिला नगरसेवक म्हणून निवडून आणत महापौर पदावरदेखील बसवले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पळसे गटात घोलप यांनी धाकटी मुलगी तनुजा हिला उमेदवारी मिळवून दिली. मात्र निवडणुकीत तनुजाचा पराभव होऊन घोलप यांना पहिला धक्का बसला. दरम्यान, न्यायालयाने घोलप यांना ६ वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घातल्याने पुत्र योगेश याला उभे करून निवडूनदेखील आणले.

मुलगी तनुजा हिचा पराभवाचा झटका योगेशच्या यशामुळे पुसला गेला. मात्र २०१७ च्या मनपा निवडणुकीत घोलपांची मोठी मुलगी नयना व धाकटी तनुजा या दोघींना उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यावेळी दोन्हीही मुलींना पराभवाचा फटका बसला.

तीन वर्षांपासून कलहात वाढ

राजकारणातील इर्षा व भावा-बहिणीला भेटले पण आपल्याला नाही या विचारामुळे तीन साडेतीन वर्षांपूर्वी धाकटी मुलगी तनुजा निलेश भोईर हिने वडील बबनराव घोलप यांना राजकीय धक्का देत भाजपामध्ये प्रवेश केला. तनुजा यांना आमदारकीचे स्वप्न पडू लागल्याने दोघे पती-पत्नी गत ३ वर्षापासून मतदारसंघात पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत होते. राजकीय ईर्षेपोटी वाढत चाललेला कलह न मिटता वाढतच गेल्याने अखेर तनुजा हिने देवळाली मतदारसंघातून अपक्ष व एक प्रकारे भाऊ योगेश विरुद्ध उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे खुद्द नानांना मुलगी तनुजा हिचा विवाह झाला असून, तिने आपले नाव न वापरता सासरचे नाव वापरावे, अशी जाहीर नोटीस देण्याची पाळी आली. राजकीय ईर्षेपुढे घोलप हे हतबल झाल्याने त्यांना मुलीबाबत जाहीर नोटीस देण्याची पाळी आल्याने राजकारण व रक्ताचे नाते चर्चेचा विषय ठरले.
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 babanrao gholap send notice to daughter tanuja gholap about not use family name in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.