महायुतीत धक्के पे धक्का; देवळाली मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 10:05 AM2024-11-05T10:05:03+5:302024-11-05T10:05:09+5:30
देवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा महायुतीतील घटक पक्षातील राजकारण व हेव्यादाव्यामुळे अंतर्गत डोकेदुखी ठरत असल्याचे सांगितले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी महायुतीतील घटक शिंदेसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेला एबी फॉर्म ग्राह्य धरू नये, असे पत्र देऊन महायुती धर्म पाळण्याचा डाव खेळला. मात्र, प्रत्यक्षात महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे, शिंदेसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव, महाविकास आघाडीचे योगेश घोलप असे एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत.
देवळाली मतदारसंघाची निवडणूक यंदा महायुतीतील घटक पक्षातील राजकारण व हेव्यादाव्यामुळे अंतर्गत डोकेदुखी प्रचारापूर्वी तापदायक आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या काही मिनिटात देवळालीच्या निवडणुकीत ट्रिस्ट निर्माण करत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून एबी फॉर्मसह राजश्री अहिरराव यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे निवडणुकीत मतदानापूर्वीच महायुतीतील दोघा घटक पक्षांनी एकमेकांसमोर दंड थोपटल्याचे चित्र निर्माण झाले होते.
हतबलता की देखावा
महायुतीतील घटक पक्षाच्या आहिरे व अहिरराव या दोन अधिकृत उमेदवार होत्या. अहिरराव या अर्ज मागे घेतील अशी अटकळ बांधली जात होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तासभराचा अवधी शिल्लक असताना माजी खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख विजय करंजकर, सह संपर्कप्रमुख राजू लवटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शर्मिला भोसले यांना शिंदेसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्या सहीचे पत्र दिले. त्यामध्ये राजश्री अहिरराव यांना शिवसेना पक्ष अधिकृत उमेदवार तसेच आवश्यक अवब पत्र दिले होते. उमेदवारी मागे घेण्याचे निश्चित केले होते. परंतु, काही कारणास्तव त्या प्रत्यक्ष उपलब्ध होऊ शकत नाही. पक्षाचे अ व ब प पत्र मागे घेत आहोत. त्यामुळे सदर उमेदवार शिवसेना पक्षाचा अधिकृत उमेदवार न समजता त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी त्या पत्रात करण्यात आलेली आहे. या पत्रामुळे अहिरराव या अपक्ष म्हणून राहू शकतील.
महायुतीत धक्के पे धक्का
देवळाली मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम क्षणी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून राजश्री अहिरराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या तासाला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देऊन अधिकृत उमेदवार समजू नये अशी विनंती केली. मात्र शिवसेनेकडून दिलेले पत्र हे कायद्याच्या चौकटीत नसल्याने महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी यांच्या धक्के पे धक्का तंत्रामुळे उमेदवारांची मात्र पंचाईत झाली आहे.
सहा जणांची माघारी
सुनील कोथमिरे, संतोष साळवे, तनुजा घोलप, प्रकाश दोंदे, दिलीप मोरे, रामदास सदाफुले या सहा जणांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. माघारी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज आहिरे, शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री अहिरराव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे योगेश घोलप, मनसेच्या मोहिनी जाधव, वंचितचे अविनाश शिंदे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विनोद गवळी, राजू मोरे, अमोल कांबळे, कृष्णा पगारे, रविकिरण घोलप, लक्ष्मी ताठे, भारती वाघ हे १२ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीच्या मुदतीनंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले.