हमीभावापेक्षा बाजारभाव कमी झाल्यास मदत देणार: देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2024 01:32 PM2024-11-18T13:32:40+5:302024-11-18T13:33:36+5:30
रविवार गाजला प्रचारसभांनी : सर्वच उमेदवारांनी साधली पर्वणी
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : शेतकऱ्यांच्या अडचणींची सरकारला जाणीव आहे. जर हमी भावापेक्षा बाजारभाव कमी झाले तर शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापुढे निर्यात बंदी होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी दिले.
चांदवड येथे आयोजित जाहीर सभेमध्ये त्यांनी महायुती सरकारने केलेल्या विविध कल्याणकारी कामांची तसेच शेतकरी आणि महिलांसाठीच्या योजनांची माहिती दिली. चांदवड देवळा मतदारसंघाच्या विकासासाठी डॉ. राहुल आहेर कसे प्रयत्नशील आहेत, याचीही अनेक उदाहरणे त्यांनी दिली. प्रचारातील शेवटचा रविवार असल्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. विविध ठिकाणी प्रचार सभा, रॅली काढण्यात आल्या.
स्मार्ट शेतकरी गरजेचा : नितीन गडकरी
सटाणा : स्मार्ट सिटीबरोबरच आता स्मार्ट शेतकरी गरजेचा आहे. शेतकऱ्याला अन्नदाता नव्हे तर तो ऊर्जादाता, इंधनदाता करण्यासाठी महायुतीचे शासन कटिबद्ध असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला.
वक्फ बोर्डच्या मालमत्ता हस्तगत करण्याचे षड्यंत्र
मालेगाव : केंद्र सरकारकडून वक्फ बोर्डाचे विधेयक आणून वक्फची मालमत्ता हस्तगत करण्याचे षड्यंत्र सुरू असून, ते हाणून पाडले जाईल, असे प्रतिपादन एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मालेगाव मध्य मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत केले.