देवेंद्र फडणवीस यांनी जिव्हाळ्याच्या प्रश्नांना घातला हात; केलेल्या कामांची जंत्री केली सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2024 01:18 PM2024-11-18T13:18:27+5:302024-11-18T13:23:53+5:30
टीकांना तोंड न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घातला आणि त्यावरच मतपेरणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर या घोषणेची विरोधकांनी खिल्ली उडविली. मात्र, अशा टीकांना तोंड न देता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिककरांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांना हात घातला आणि त्यावरच मतपेरणी केली.
मुंबई-पुण्याच्या तुलनेत विकासासाठी नाशिकच्या राजकीय नेत्यांमध्ये इच्छाशक्ती नसल्याची खंत वेळोवेळी विविध समाजसेवी आणि व्यावसायिक संघटना व्यक्त करतात. २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत मी नाशिकला दत्तक घेतो, अशी घोषणा केली. त्यामुळे नाशिककरांनी भरभरून मते दिली. वास्तविक नाशिक महापालिका आणि शासन या दोन्ही गोष्टी भिन्न असल्या तरी त्यानंतर कोणत्याही नकारात्मक गोष्टीच्या वेळी दत्तक नाशिक म्हणून खिल्ली उडविली गेली. दत्तक नाशिक म्हणजे काय याचा खुलासा फडणवीस यांनी एकदा केला त्यावेळी त्यांनी सर्वांचे प्रयत्न, अनुकूल वातावरण असेल तर आपण योजना देऊ शकू, असे सांगितले होते.
रविवारी (दि.१७) झालेल्या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारने कशाप्रकारे कामे अडवली ते सांगून आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत अडविलेल्या कुंभमेळ्याच्या निधीपासूनची जंत्रीच वाचून दाखवली. नाशिकला आता विमान सेवा आहे, त्यामुळे आयटी पार्कचा मार्ग मोकळा झाला असे सांगताना त्यांनी दिंडोरीतील अक्राळे येथील रिलायन्स कंपनी तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या गुंतवणुकीबद्दल सांगून नाशिकला काहीच आले नाही असे सांगणाऱ्यांना उत्तर दिले.
जुन्या घोषणांना उजाळा दिल्यानंतर आता नाशिककरांना पुन्हा फडणवीस यांनी साद घातली आहे. ती कितपत उपयुक्त ठरते ते निवडणुकीत दिसेलच.
दाखविली अनेक स्वप्ने
आगामी काळात नाशिकला कुंभमेळा होऊ घातला आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांबरोबरच दळणवळणाची साधे, महामार्ग विस्तार अशी अनेक स्वप्न उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली आहे. स्थानिक राजकारणावर न बोलताना त्यांनी कोणाचा उल्लेख केला नाही. मात्र, अंडरवर्ल्ड'शी संबंध असलेले असे नाव न घेता टीका केली.