पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नाशिक शहरातील सात वाहतूक मार्गात बदल; दोन दिवस निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:47 AM2024-11-07T08:47:29+5:302024-11-07T08:47:35+5:30

सात मार्गांवरच्या वाहतुकीचे नियोजन करीत त्यात दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 changes in seven traffic routes in nashik city for pm narendra modi campaign rally | पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नाशिक शहरातील सात वाहतूक मार्गात बदल; दोन दिवस निर्बंध

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी नाशिक शहरातील सात वाहतूक मार्गात बदल; दोन दिवस निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक :नाशिक जिल्ह्यातील महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी (दि. ८) तपोवनात दुपारी सभा होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर शहरातील पंचवटी भागात जाणाऱ्या सात मार्गावरच्या वाहतुकीचे नियोजन करीत त्यात दोन दिवसांसाठी बदल करण्यात आला आहे. गुरुवार ते शुक्रवार (दि. ७ ते ८) असे दोन दिवस हे बदल लागू राहणार असल्याने वाहनधारकांना त्याची माहिती ठेवावी लागणार आहे.

सभास्थळी मंडप उभारणीचे काम सुरू असल्याने पक्षाच्या नेत्यांसह सुरक्षा यंत्रणेने त्याची पाहणी केली. गुरुवारी पंतप्रधान दौरा व बंदोबस्ताची रंगीत तालीम होणार असल्याने वाहतूक मार्गात निर्बंध लागू असतील. या मार्गावरील वाहतुकीसाठी वेळ आणि नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत निर्बंध लागू असतील. 

तर शुक्रवारी सकाळी १० ते सभा संपेपर्यंत निर्बंध लागू राहणार आहेत. राज्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सभास्थळाजवळ आठ ठिकाणी नागरिकांसाठी वाहनतळ निश्चित करण्यात आली आहेत, तर वाहनतळापासून सभास्थळापर्यंत नागरिकांना पायी जावे लागणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढली आहे.

असे आहेत निर्बंध...

- वणी-दिंडोरी-पेठरोडकडून : पेठ व दिंडोरी रस्त्याने येणारी वाहने आरटीओ सिग्नलमार्गे रासबिहारी चौफुलीवरून मुंबई-आग्रा महामार्ग येथून निलगिरी बाग येथील सिद्धिविनायक लॉन्ससमोर पोहोचतील.

- मुंबईकडून येणारी वाहने : मुंबई नाका-द्वारका- टाकळी फाट्यावरून ट्रॅक्टर हाऊसमार्गे काशी मंगल कार्यालय येथून गोदावरी घायावर वाहने पार्क करतील.

- पुणे: पुणे, अहमदनगर, शिर्डी, संगमनेर, सिन्नर, पळसे, एकलहरे, नाशिक रोड, देवळाली कॅम्प, भगूरमार्गे येणारी वाहने नाशिक रोड रेल्वे पुलाकडून बिटको सिग्नल, जेलरोड-दसक-नांदूर नाका सिग्नलवरून छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून जेजुरकर मळ्यासमोरील जागेत वाहने पार करतील. त्यानंतर पायी सभास्थळी पोहोचतील.

- छत्रपती संभाजीनगर : येवला, लासलगाव, निफाड, विंचूर, चांदोरी, सायखेडा, चेहडी, ओढा, लाखलगाव, शिलापूरकडील वाहने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरून जनार्दन स्वामी मठाजवळील जागेत पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- धुळे : धुळे, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा, पिंपळगाव बसवंत, ओझरकडील वाहने रासबिहारी- बळी मंदिरमार्गे डाळिंब मार्केट या ठिकाणी वाहने लावली जातील.

- मुंबई : मुंबई आग्रा महामार्गावरून धुळे, मालेगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उड्डाणपुलावरून मार्ग मोकळा असेल. मुंबईकडून छत्रपती संभाजीनगरसाठी वाहने द्वारकामार्गे बिटको चौक-जेलरोडवरून नांदूरनाकामार्गे जाता येईल.

- नाशिक : काट्या मारुती चौकातून उजव्या बाजूने टकले नगर, कृष्णा नगर, तपोवन क्रॉसिंग करून संतोष टी पॉइंटकडून लक्ष्मी नारायण लॉन्स समोरून कपिला संगमच्या पुढे वाहने जातील.

- शहरातील दुचाकी लक्ष्मी नारायण मंदिरासमोरून तपोवन रस्त्याच्या उजव्या बाजूने बुटुक हनुमान मंदिर येथील मोकळ्या जागेत उभी करतील.

- खासदार, आमदार, शासकीय व पोलिस अधिकारी-कर्मचारी त्यांची वाहने साधुग्रामजवळील कमानीच्या उजव्या बाजूकडील मोकळ्या जागेत उभी करतील.
 

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 changes in seven traffic routes in nashik city for pm narendra modi campaign rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.