महायुतीत दोघांमध्ये तिसरा असल्याने जागांमध्ये घट; भाजपा जैसे थे, पण शिंदेसेनेला अवघ्या ३ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 09:35 AM2024-11-06T09:35:33+5:302024-11-06T09:37:14+5:30
नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप युतीने एकत्रित निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेने आठ, तर भाजपने सात जागा लढवल्या. यात भाजपाचा स्ट्राइक रेट जास्त राहिला. शिवसेनेच्या मात्र अवघ्या दोन जागा निवडून आल्या; परंतु यंदा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गट सामील झाल्याने 'दोघांत तिसरा' अशी अवस्था असून त्यामुळेच भाजपाच्या जागांमध्ये फार फरक पडला नसला तरी शिवसेना म्हणजेच शिंदेसेनेच्या वाट्याला अवघ्या तीन जागा आल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात विधानसभेच्या १५ जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने पाच जागा जिंकल्या होत्या. मात्र, भाजपाने एकूण सात जागा लढवल्या होत्या. यात मालेगाव मध्यमधून भाजपाच्या दीपाली वारूळे या पराभूत झाल्या होत्या. तेथे एमआयएमचे मौलाना मुफ्ती मोहमद निवडून आले होते. यंदा भाजपाला नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, बागलाण आणि चांदवड देवळा या मतदारसंघांतील विद्यमान आमदारांच्या सर्व जागा पुन्हा मिळाल्या आहेत. यात नाशिक पूर्वमध्ये अॅड. राहुल ढिकले, नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे, नाशिक मध्य मध्ये प्रा. देवयानी फरांदे, चांदवड देवळामध्ये आमदार डॉ. राहुल आहेर, बागलाणमध्ये आमदार दिलीप बोरसे यांचा समावेश आहे. मालेगाव मध्यमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा देण्यात येणार होती. मात्र, त्यांच्या संभाव्य उमेदवाराने स्वतंत्र पक्ष स्थापन केल्याने ही जागा भाजपाला देण्यात आली. भाजपाने कल्पना भुसे यांना उमेदवारी दिली आहे.
शिंदेसेनेने गेल्यावेळी आठ जागा लढवल्या होत्या. त्यांतील मालेगाव बाह्यमध्ये दादा भुसे आणि नांदगावमध्ये सुहास कांदे निवडून आले होते. देवळालीत योगेश घोलप, इगतपुरीत निर्मला गावित, कळवणला मोहन गांगुर्डे, येवला येथे संभाजी पवार, सिन्नर येथे राजाभाऊ वाजे, निफाड अनिल कदम आणि दिंडोरीत भास्कर गावित यांचा पराभव झाला होता. यंदा शिवसेनेतील फुटीनंतर या पक्षाचे आमदार असलेले दोन्ही आमदार शिंदेसेनेत सहभागी झाले आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश झाल्यानंतर सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे. गेल्या वेळी आठ जागा लढवणारी शिवसेना आता अवघ्या तीन जागांवर लढत आहे; तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला सात जागा मिळाल्या आहेत. गेल्यावेळी आमदार असलेल्या येवला (छगन भुजबळ), नितीन पवार (कळवण), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), दिलीप बनकर (निफाड), सिन्नर (माणिकराव कोकाटे), सरोज आहिरे (देवळाली) याबरोबरच पूर्वी काँग्रेसकडे असलेल्या जागांपैकी इगतपुरी इगतपुरी मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला असून, हिरामण खोसकर या मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत.