डॉ. बोरसे यांच्या उमेदवारीने भुजबळ, कांदेंची अडचण; सामाजिक समीकरणावर भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2024 10:49 AM2024-11-03T10:49:03+5:302024-11-03T10:49:27+5:30
डॉ. रोहन बोरसे हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत. ते मनोज जरांगे-पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. बोरसे यांना जरांगे यांनी उमेदवारी घोषित केल्यास मराठा, मुस्लीम व दलित मते यांचे समीकरण जुळल्यास समीर भुजबळ व सुहास कांदे यांची अडचण होण्याची शक्यता आहे.
नाशिक : नांदगाव मतदारसंघात तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना मराठा महासंघाचे समर्थन असल्याची चर्चा आहे.
नांदगाव मतदारसंघात ३४ उमेदवारांनी ४२ अर्ज दाखल केले होते. छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आता या मतदारसंघात ३२ उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असे चित्र आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून शिंदेसेनेच्या वतीने आमदार कांदे यांनी अर्ज दाखल केला आहे. उद्धवसेनेचे गणेश धात्रक विरोधात उमेदवारी करीत आहेत. हे दोघेही एकमेकांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी खासदार समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा देऊन या मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे.
नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन बोरसे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
बोरसे जरांगे-पाटील यांच्या संपर्कात?
मतदारसंघात भुजबळ विरुद्ध कांदे ही अर्थात ओबीसी विरुद्ध ओबीसी अशी लढत निर्माण झाली होती. त्यात तिसरे उद्धवसेनेचे उमेदवार धात्रक हे देखील ओबीसीच आहेत. डॉ. रोहन बोरसे हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत. याशिवाय ते स्थानिक व नांदगाव परिसरातील आहेत. ते मनोज जरांगे-पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जरांगे-पाटील हे आपल्या उमेदवाराची रविवारी घोषणा करणार आहेत. बोरसे यांना जरांगे यांनी उमेदवारी घोषित केल्यास मराठा, मुस्लीम व दलित मते यांचे समीकरण जुळल्यास समीर भुजबळ व सुहास कांदे यांची अडचण होण्याची शक्यता आहे.