केदा आहेर, आत्माराम कुंभार्डे यांची भाजपमधून हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 12:30 PM2024-11-09T12:30:55+5:302024-11-09T12:31:00+5:30
पक्ष शिस्तीचा भंग केल्याबद्दल कारवाई
नाशिक : विधानसभा निवडणुकीत चांदवड-देवळा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवारी करणारे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या विरोधात बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार केदा आहेर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांची पक्ष शिस्तीचा भंग केल्याबद्दल भाजपतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचे निशाण फडकविणारे मालेगाव बाह्यमधील उमेदवार कुणाल सूर्यवंशी, बागलाण मतदारसंघातील उमेदवार आकाश साळुंखे व जयश्री गरुड या तिघांची दोनच दिवसांपूर्वी भाजपने हकालपट्टी केली होती. परंतु चांदवड देवळा मतदारसंघातील भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करणारे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर तसेच चांदवड येथील भाजपचे पदाधिकारी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या नावाचा समावेश नसल्याने त्यांना अभय दिल्याची चर्चा होत होती.
चांदवड देवळा मतदारसंघातून भाजपने सलग तिसऱ्यांदा आमदार डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर नाट्यमय घडामोडी होत स्वतः राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवारीसाठी आपले चुलत बंधू केदा आहेर यांच्या नावाची शिफारस केली. त्यानंतर डॉ. राहुल आहेर यांनी केदा आहेर यांच्या समवेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. परंतु भाजपने डॉ. राहुल आहेर यांची उमेदवारी कायम ठेवल्याने केदा आहेर बंडाचे निशाण फडकवत अपक्ष उमेदवारी करत आहेत. त्याचबरोबर डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांनी केदा आहेर यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे भाजपच्या प्रदेश कार्यालयाने केदा आहेर व आत्माराम कुंभार्डे या दोहोंची पक्षातून हकालपट्टी केली आहे.