आजी-माजी आमदारांच्या लढती लक्षवेधी; विद्यमानांची अस्तित्वासाठी, माजी आमदारांची पुन्हा येण्यासाठी धडपड

By धनंजय रिसोडकर | Published: November 10, 2024 12:52 PM2024-11-10T12:52:20+5:302024-11-10T12:52:20+5:30

सात जागांवर थेट लढत

maharashtra assembly vidhan sabha election 2024 former and current mla fights are eye catching in nashik | आजी-माजी आमदारांच्या लढती लक्षवेधी; विद्यमानांची अस्तित्वासाठी, माजी आमदारांची पुन्हा येण्यासाठी धडपड

आजी-माजी आमदारांच्या लढती लक्षवेधी; विद्यमानांची अस्तित्वासाठी, माजी आमदारांची पुन्हा येण्यासाठी धडपड

धनंजय रिसोडकर, लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १५ जागांवरील लढती अटीतटीच्या होणार आहेत. मात्र, त्यातही काही लढती या विशेष लक्षवेधी ठरणार आहेत. त्यात सात जागांवर आजी-माजी आमदार आमने-सामने असल्याने त्या लढतींकडे जिल्ह्याचे विशेष लक्ष लागले आहे. त्यात देवळाली, नाशिक मध्य, निफाड, बागलाण, देवळा-चांदवड, मालेगाव बाह्य आणि इगतपुरी या मतदारसंघांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ज्या मतदारसंघांमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांशी भिडत असून, ते दोन्ही उमेदवार एकमेकांच्या सकारात्मक, नकारात्मक बाजू जाणून आहेत.

केवळ इगतपुरीत तीन माजी आमदारांमध्ये लढत

इगतपुरी मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून हिरामण खोसकर निवडून आले होते. यंदा खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे, तर मनसेकडून माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, तसेच माजी आमदार निर्मला गावित या रिंगणात असल्याने या मतदारसंघात दोन माजी आणि एक विद्यमान आमदार अशी लढत बघायला मिळणार आहे. येथे २ लाख ७८ हजार ९११ मतदार असून, या आजी-माजी आमदारांपैकी कोणता उमेदवार अधिक मते खेचतो, त्यावर निकाल स्पष्ट होणार आहे. तर, नांदगावमध्ये शिंदेसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले एकमेव माजी खासदार असलेले समीर भुजबळ यांची झुंज रंगतदार ठरत आहे.

- नाशिक मध्य : नाशिक मध्य मतदार- संघात २०१९ मध्ये भाजपच्या देवयानी फरांदे या निवडून आल्या होत्या. यंदा पुन्हा भाजपकडून फरांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर उद्धवसेनेकडून वसंत गिते निवडणूक रिंगणात आहेत. गिते यांनी २००९ मध्ये मनसेकडून लढत आमदारकी पटकावली होती. दरम्यान या मतदारसंघात ३ लाख ४१ हजार २०८ मतदार असून, हे मतदार आजी-माजीपैकी कुणाला झुकते माप देतात, त्यावर नाशिक मध्य मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे ठरू शकणार आहे.

- कळवण : कळवण मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नितीन पवार निवडून आले होते. यंदा पुन्हा नितीन पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्ह्यात एकमेव जागा माकपाला देण्यात आली आहे. त्यात सहावेळा आमदार राहिलेल्या माजी आमदार जीवा पांडू गावित यांचा पवार यांच्याशी सामना होणार आहे. या मतदारसंघात ३ लाख ७७९ मतदार असून, या क्षेत्रातील आदिवासी मतदार कुणाला आपला मानतो, त्यावरच या जागेचा निकाल ठरणार आहे.

- चांदवड : चांदवड मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे डॉ. राहुल आहेर हे निवडून आले होते, तसेच काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांची लढत रंगतदार ठरणार आहे. त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेरदेखील या स्पर्धेत उतरल्याने विद्यमान आमदार, तसेच दोन पक्षांचे जिल्हाध्यक्ष अशी ही लढत जिल्ह्यात केंद्रस्थानी आली आहे. या मतदारसंघात ३ लाख ७ हजार ३६३ मतदार असून, त्या मतांचे त्रिभाजन कसे होते, त्यावर या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

- निफाडः निफाड मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप बनकर निवडून आले होते. यंदा पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून बनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, उद्धवसेनेकडून अनिल कदम यांच्यात थेट पारंपरिक लढत होणार आहे. या मतदारसंघात २ लाख ९७ हजार १५४ मतदार असून, सर्व मतदारांनी दोन्ही आमदारांची कारकीर्द अनुभवलेली असल्याने लढत अत्यंत काट्याची होणार हे निश्चित आहे.

- बागलाण : बागलाण मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपचे दिलीप बोरसे निवडून आले होते. यंदा पुन्हा भाजपच्या वतीने दिलीप बोरसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवार गटाकडून दीपिका चव्हाण निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात २ लाख ९७ हजार ७६० मतदार असून, या मतदारसंघातही नागरिक विद्यमान आमदाराला संधी देतात की, माजी आमदार असलेल्या दीपिका चव्हाण यांना संधी देतात, ते निकालानंतरच समजू शकणार आहे.

- मालेगाव मध्य : मालेगाव मध्य मतदारसंघात २०१९ मध्ये एमआयएम पक्षाकडून मुक्ती मोहम्मद इस्माइल हे निवडून आले होते. यंदा पुन्हा एमआयएम पक्षाकडून मुफ्ती इस्माइल यांना उमेदवारी देण्यात आली, तर इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली पार्टीच्या वतीने माजी आमदार असिफ शेख यांना उमेदवारी देण्यात आल्याने ही लढत लक्षवेधी ठरणार आहे. या मतदार संघात महाराष्ट्रातील एकाही मोठ्या पक्षाला उमेदवार देता आलेला नाही. या मतदारसंघात ३ लाख ४० हजार ६७० मतदार त्यांचा आमदार निश्चित करणार आहेत.

- मालेगाव बाह्य : मालेगाव बाह्य मतदारसंघात २०१९ मध्ये शिवसेनेचे दादा भुसे निवडून आले होते. यंदा पुन्हा शिंदेसेनेकडून भुसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव- सेनेने माजी आमदार अद्वय हिरे यांना रिंगणात उतरवले आहे. भुसे यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे, तर हिरे घराणे पुन्हा त्यांचे बस्तान माले- गावमध्ये बसविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मतदार- संघातील ३ लाख ७७ हजार ३०८ मतदार त्यांचा

- देवळाली मतदारसंघ : देवळाली मतदारसंघात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सरोज अहिरे निवडून आल्या होत्या. यंदा पुन्हा अहिरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात उद्धवसेनेकडून माजी आमदार योगेश घोलप हे रणांगणात आहेत. या मतदारसंघात २ लाख ८४ हजार २९९ मतदार असून, आता या मतदारांपैकी किती मतदार अहिरे यांना आणि किती आमदार घोलप यांना मतदान करतात, त्यावर निवडणुकीचा कल ठरणार आहे.

 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 former and current mla fights are eye catching in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.