शरद पवार यांच्याकडून 'सबको साथ'चा फॉर्म्युला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 01:00 PM2024-11-14T13:00:11+5:302024-11-14T13:00:11+5:30
पवार हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यापेक्षाही त्यांच्या कृतीपूर्ण राजकारणासाठी अधिक ओळखले जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांच्या प्रचारसभांतील काही कृतींनी पदाधिकाऱ्यांची मने जिंकून घेतली, तर काही प्रचारसभांमध्ये विरोधी उमेदवारांना प्रचंड झोडपणे, तर एखाद्या जागेवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा नामोल्लेख टाळण्याने कार्यकर्तेच संभ्रमात पडल्याची चर्चा आहे.
पवार हे त्यांच्या वक्तृत्व कौशल्यापेक्षाही त्यांच्या कृतीपूर्ण राजकारणासाठी अधिक ओळखले जातात. कुठे काय बोलायचे इतकेच नव्हे तर कुठे काय बोलायचे नाही, याबाबतचे सर्वाधिक भान असणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
त्याप्रमाणे त्यांनी नाशिक पूर्व मतदारसंघासाठी आडगावला झालेल्या सभेत नाशिक महानगरातील मविआच्या चारही उमेदवारांना स्टेजवर बोलावून त्यांच्यासमवेत उभे राहून हात उंचावत एकप्रकारे या चारही उमेदवारांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर पूर्व मतदारसंघातील अन्य इच्छुक जगदीश गोडसे आणि अतुल मते यांचा नामोल्लेख करीत पूर्व मतदारसंघामधील पक्षाच्या प्रमुख इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न केल्याचे दिसून आले.
एकुणात शरद पवार यांनी त्यांच्या नाशिक शहरातील सभेतून 'सबको साथ' घेत मविआतील सर्वच उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे संकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिल्याचे दिसून आले.