इकडे बंड, तिकडे बंड कसे करणार थंड! गिरीश महाजन नाशिकमध्ये तीन दिवस ठोकणार तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2024 09:33 AM2024-11-01T09:33:00+5:302024-11-01T09:35:55+5:30
भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने संकटमोचक गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये पाठविले असून तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून नाराजांना सक्रिय करणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बंडखोरांचे बंड शमविण्यासाठी पक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी स्थानिक अधिकृत उमेदवार प्रयत्न करीत आहेत, तर काही ठिकाणी मात्र पदांचे आश्वासन देऊन माघार घेतली जात आहे. नाशिक मध्यमध्ये मनसे माघार घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. काँग्रेसच्या बंडखोर डॉ. हेमलता पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करीत आहेत, तर भाजपातील अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने संकटमोचक गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये पाठविले असून तीन दिवस नाशिकमध्ये तळ ठोकून असून ते नाराजांना सक्रिय करणार आहेत.
दरम्यान, महाजन यांनी वसंत स्मृती कार्यालयात बैठक घेऊन पंधरा मतदारसंघांचा आढावा घेतला. यातील कोण काम करते आणि करीत नाही याची माहिती संकलित केली असून पुढील ३ दिवस ते नाराजांशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करणार आहेत. नाशिक शहरात तिन्ही मतदारसंघात भाजपाचे आमदार असून तिघांनाही भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, काही मतदारसंघात राजी-नाराजीचे वातावरण आहे. भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी काही प्रमाणात वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. नाशिकबाबत गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी गुरुवारी (दि.२४) नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील बंडखोरांशी तसेच नाराज गटांशी चर्चा केली.
काँग्रेसचे प्रयत्न, मनसेची चर्चा
नाशिक शहरातील चार मतदारसंघांपैकी नाशिक मध्यमध्ये काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी डावलल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघातून उद्धवसेनेने वसंत गीते यांना उमेदवारी दिली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी उद्धवसेनेकडून काँग्रेस पक्षाशी संपर्क साधण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाकडून डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला जात आहे. पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी राज्यात कोठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याचे सांगितले असले तरी डॉ. पाटील यांनी नाशिकमध्ये तत्काळ माघार घेणार नसल्याचे माध्यमांना सांगितले, तर दुसरीकडे नाशिक मध्यमधून मनसेचे उमदेवार अंकुश पवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. अर्थात, त्यासाठी भाजपाकडूनच प्रयत्न केले जात असून मतविभागणी टाळण्याचे प्रयत्न आहेत.
देवळालीत वेगळाच पेच
देवळाली मतदारसंघात वेगळाच पेच असून या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार आमदार सरोज आहिरे यांच्या विरोधात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेने राजश्री अहिरराव यांना उमेदवारी दिल्याने अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शिंदेसेनेने उमेदवारी मागे घ्यावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अजित पवार यात लक्ष घालत असून सोमवारपर्यंत तोडगा काढण्यासाठी धावपळ सुरू आहे.