हिंजवडीला आयटी पार्क मग नाशकात का नाही?; शरद पवार यांचा प्रचारसभेत थेट सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 01:08 PM2024-11-13T13:08:12+5:302024-11-13T13:09:26+5:30
पुण्यासारखे आयटी पार्क नाशिकला झाले पाहिजे. नाशिकला जमीन आहे. कष्ट करणारे लोक आहेत. शिक्षित युवकांची संख्या आहे. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क केले तर हाताला काम मिळेल, असे शरद पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : आम्ही पुण्यात हिंजवडीत आयटी पार्क उभे केले, तेथे एक लाख युवक युवती काम करतात. हे काम पुण्याला होऊ शकते तर नाशिकमध्ये का नाही असा थेट प्रश्न करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महायुती सरकारला लक्ष्य केले. नाशिकच्या मध्ये आयटी आणि लॉजीस्टीक पार्क आले पाहिजे असेही पवार म्हणाले. नाशिक पूर्व विभागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्या प्रचारासाठी आडगाव येथे मंगळवारी (दि.१२) यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर खासदार डॉ. शोभा बच्छाव तसेच उमेदवार गणेश गिते, मध्य नाशिकमधील उध्दव सेनेचे उमेदवार वसंत गीते, पश्चीम नाशिक मतदार संघातील उमेदवर सुधाकर बडगुजर, देवळाली मतदार संघातील उमेदवर योगेश घोलप, उध्दव सेनेचे उपनेते सुनील बागुल, दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, राष्ट्रवादीचे नेते नाना महाले, माजी आमदार नितीन भोसले, गोकूळ पिंगळे, गजानन शेलार, शरद आहेर, यांच्यासह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
नाशिक आणि आडगावबद्दल बोलताना त्यांनी विकासाची क्षमता असल्याचे नमूद केले. आडगाव जवळ आयटी पार्क, लॉजीस्टीक पार्कसाठी जागा उपलब्ध आहे. त्यामुळे पुण्यासारखे आयटी पार्क नाशिकला झाले पाहिजे. नाशिकला जमीन आहे. कष्ट करणारे लोक आहेत. शिक्षित युवकांची संख्या आहे. आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क केले तर हाताला काम मिळेल. तसेच नाशिकच्या सांपत्तीक स्थितीत सुधारणा होईल, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, भगिनींना मदत करण्यासाठी योजना काढली. मात्र, त्यांचे संरक्षण करण्याची गरज आहे, असे सांगून शरद पवार यांनी शेतमालास किंमत मिळत नाही. त्यामुळे तो कर्जबाजारी होतात. यामुळे आत्महत्या होतात. शेतमालाच्या किंमती रास्त दिल्या पाहिजेत. मुलांना योग्य प्रकारे नोकरी मिळत नाही तोपर्यंत चार हजार रुपये दिले पाहिजे. राज्याची सत्ता हाती येत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम राबविता येणार नाही. असेही ते म्हणाले. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी केले. यावेळी खासदार डॉ शोभा बच्छाव, निरीक्षक नितेश कराळे, ज्येष्ठ नेते राजा पूरकर, दत्ता गायकवाड, अॅड. जे. टी. शिंदे भाकपाचे राजू देसले यांनी मनोगत व्यक्त केले.
गेल्या पंधरा वर्षात नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात विकास कामे झालेली नाहीत. त्यामुळे यंदा मतदार संघात बदल आणायचा आहे, असे सांगून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांनी स्थायी समिती सभापतीपदाच्या कालावधीत केलेल्या कामांची जंत्रीच वाचली. पंचवटीत ३५ एकर क्षेत्रात स्टेडीयम उभारले असून सिटी लिंक बस सेवा आपल्या कारकिर्दीत सुरु करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे स्मृती बिटको रुग्णालय सुरू केले अशी कामे सांगतानाच मतदार संघात प्रचाराच्या दरम्यान अनेक अडचणी आणि आव्हाने आहेत. आपल्या आईला नांदूर गावात दमदाटी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.