पहिल्या यादीत आमदार दिलीप बनकर वेटिंगवर! निफाडच्या जागेसाठी भाजप आग्रही; राजकीय चर्चाना उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 08:32 AM2024-10-24T08:32:19+5:302024-10-24T08:35:06+5:30
अजित पवार गटाने निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना वेटिंगवर ठेवले असून, निफाडच्या जागेसाठी भाजपचे यतीन कदम आग्रही असल्याने गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्ह्यातील आपल्या पाचही आमदारांवर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, निफाडचे आमदार दिलीप बनकर यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, निफाडच्या जागेसाठी भाजपचे यतीन कदम हे आग्रही असल्याने गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत तळ ठोकून आहेत.
पक्षाकडून बुधवारी (दि.२३) अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीत आमदार दिलीप बनकर यांचे नाव नसल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. पक्षाकडून येवला, दिंडोरी, सिन्नर, कळवण, देवळाली या मतदारसंघातील आपल्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर इगतपुरीतून काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना आयात करून त्यांनाही तिकीट देण्यात आले आहे. मात्र, केवळ बनकर यांचेच नाव वेटिंगवर असल्याने अजित पवार निफाड मतदारसंघासाठी कोणती भूमिका घेतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
महायुतीचा तीन जागांचा तिढा
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जिल्ह्यातील १२ उमेदवार घोषित केले असून, अद्यापही तिन जागांचा तिढा कायम आहे. हा तिढा कधी सुटतो? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
दिनकर पाटील मनसेत
पक्षांतराचे वारे वेगाने ने वाहू लागले असून, भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या दिनकर पाटील यांनी बुधवारी (दि. २३) अचानकपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करीत मनसेची नाशिक पश्चिमची उमेदवारीदेखील पटकावली. तर माजी नगरसेवक अपूर्व हिरे यांनीदेखील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामधून उद्धवसेनेत उडी घेतली.
उद्धवसेनेकडून ५ मतदारसंघातील उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष उद्धवसेनेने ६५ उमेदवारांची पहिली यादी घोषित करताना नाशिक जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले. नांदगावमधून गणेश धात्रक, निफाडमधून माजी आमदार अनिल कदम, मालेगाव बाह्यमधून अद्वय हिरे, नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, तर नाशिक मध्यमधून पून माजी आमदार वसंत गिते यांच्या उमेदवारीचा समावेश आहे.
दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातून सहा उमेदवारी अर्ज दाखल
बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातून सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दोन दिवसांत निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातून म महाविकास आघाडीकडून 'माकपा'चे जे. पी. गावित यांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.