कांदे आमच्यापेक्षा सधन; त्यांना पैशांचे आमिष कसे दाखवणार?: छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2024 08:13 AM2024-10-26T08:13:23+5:302024-10-26T08:13:52+5:30
महायुतीत एकत्र असतानाही वारंवार अपिलात जाऊन कांदे विरोधात काम करतात हे त्यांनी स्वतः एकप्रकारे कबुल केले. आमच्याकडे नाही, तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आम्ही काय त्यांना पैशांचे आमिष दाखवणार, असा प्रश्न भुजबळांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : भुजबळ कुटुंबीयांनी भीतीचे वातावरण कधीही निर्माण केलेले नाही. आम्ही दबावतंत्राचा उपयोग करीत नाही. कांदे पैशाने आमच्यापेक्षा सधन आहे. त्यामुळे त्यांना पैशांचे आमिष काय दाखवायचे, असा प्रश्न अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भुजबळ शुक्रवारी (दि. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यावेळी कांदे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधान केले. कांदेंच्या या आरोपांना समीर उत्तर देतील. न्यायालयाकडून आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही. उलट महायुतीत एकत्र असतानाही वारंवार अपिलात जाऊन कांदे विरोधात काम करतात हे त्यांनी स्वतः एकप्रकारे कबुल केले. आमच्याकडे नाही, तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे. आम्ही काय त्यांना पैशांचे आमिष दाखवणार, असा प्रश्न भुजबळांनी केला.
निफाडच्या जागेबाबत लवकर निर्णय होईल. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सर्व राजकीय पक्ष असे सर्वेक्षण करीत असल्याचे नमूद केले. जिथे पक्षाला खात्री असते तिथेही सर्वेक्षण होते. समोरील उमेदवार कोण, त्याच्यासमोर कोण प्रभावी लढत देईल यासाठी वारंवार सर्वेक्षण होतात. असे भुजबळांनी सांगितले.
बंडखोरी रोखण्यासाठीच उशिराने उमेदवारी
महायुती व महाविकास आघाडीकडून काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. जिथे इच्छुकांची संख्या अधिक असते, तिथे बंडखोरीची शक्यता असते. बंडखोरी होऊ नये म्हणून उशिराने नावे जाहीर केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. शरद पवार यांच्याएवढा कदाचित राज्यातील मतदारसंघ व उमेदवारांचा कुणाचा अभ्यास नसेल, त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून बंडखोरी रोखण्यासाठी सावकाश निर्णय होईल, असेही भुजबळ म्हणाले.