नाशिर पश्चिममध्ये बंडोबांना थंड करण्यात महायुती-महाविकास आघाडीला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:43 AM2024-11-05T09:43:36+5:302024-11-05T09:44:46+5:30
भाजपाचे दिवाळीतच फुटले फटाके
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम मतदारसंघात माघारीसाठी सर्वाधिक लक्ष लागले होते. महाविकास आघाडीतील घटक पक्ष माकपाचे डॉ.डी.एल. कराड अन् भाजपातील बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक शशिकांत जाधव, दिलीप भामरे या तिघांनाही मोठ्या प्रयत्नानंतर माघार घेण्यास महायुती अन् महाविकास आघाडीला यश आले. त्यामुळे दोघा प्रमुख पक्षांना दिलासा मिळाला आहे. कराड यांच्या माघारीसाठी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत काथ्याकूट झाला. तेथे स्वतः कराड उपस्थित होते. त्यांनी पवार व राऊत यांच्याशी चर्चा केली. तर जाधव व भामरे यांच्या माघारीसाठी दिवाळीचे फटाके फुटत असताना नाशिकमध्येच प्रयत्नांची पराकाष्टा झाली. सलग दोन विधानसभा निवडणुकीनंतर डॉ. कराड आता यंदा रिंगणाबाहेर असतील.
भाजपाच्या उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या उमेदवारीस विरोध करणाऱ्या भाजपातील ८ इच्छुकांनी दंड थोपटून उमेदवारी दाखल करणार असल्याचे म्हटले होते. पण त्यापैकी सहा इच्छुकांनी मैदान सोडले तर दिनकर पाटील यांनी मनसेत प्रवेश करून भाजपवर निशाणा साधला. पण शशिकांत जाधव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक दौऱ्यात जाधव व भामरे यांच्याशी चर्चा करून आगामी निवडणुकांत योग्य तो सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांना रोखण्यात भाजपला यश आले.
तर माकपाचे डॉ.डी.एल. कराड यांना उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी सोमवारी सकाळी तातडीने मुंबईत बोलावून घेतले. तेथे खासदार संजय राऊत व शरद पवार यांनी कराड यांचेशी चर्चा करून आगामी मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीत घटक पक्ष असलेल्या माकपास जास्तीत जास्त जागा देण्याचे मान्यत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तसेच मतांचे विभाजन टाळण्यासाठी माघारीची विनंती केली. त्याला कराड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अन् ते मुंबईत असताना त्यांच्या सूचक असलेल्या प्रतिनिधीने माघारीसाठी अर्ज दाखल करत निवडणूक मैदान सोडले. आता नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाच्या सीमा हिरे, उद्धवसेनेचे सुधाकर बडगुजर, मनसेचे दिनकर पाटील या तीन उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होईल. तर स्वराज पक्षाचे दशरथ पाटील हेदेखील मैदानात आहेत.
भामरे यांच्यासोबत उमेदवार सीमा हिरे
भाजपाचे बंडखोर उमेदवार दिलीप भामरे यांना घेऊन भाजपाच्या उमेदवार सीमा हिरे स्वतः अर्ज माघारीच्या ठिकाणी दुपारी १२:१५ वाजता दाखल झाल्या. तर शशिकांत जाधव देखील लवकरच इथे येऊन माघार घेतील, असे सीमा हिरे यांनी सांगितले. अन् जाधव दुपारी दोन वाजता माघारीसाठी दाखल झालेही.