निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव नाही, पाटलांनी आता राजकारण करु नये: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 09:49 AM2024-11-05T09:49:23+5:302024-11-05T09:50:37+5:30
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क सातपूर: मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही. त्यांनी निवडणुकीतून माघारीची घेतलेली भूमिका योग्य आहे. कारण कोणत्याही एका जाती-धर्मावर निवडणूक लढविता येत नाही. मात्र, जरांगे यांनी आता राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला.
नाशिक दौऱ्यावर आले असता, आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, लोकसभेला नाही तर विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला (रिपाइं) किमान चार-पाच जागा महायुतीकडून मिळणे अपेक्षित होते. पण एकच जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. परंतु बंडखोरी नको म्हणून महायुतीसोबतच राहणार आहे. महायुतीला किमान १७० जागा मिळतील, असा आशावाद केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधक संविधान, आरक्षण या मुद्द्यांवर यशस्वी झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत हे मुद्दे टिकणार नाहीत. दलित, बौद्ध, मुस्लिम, ओबीसींची काही प्रमाणात मते मिळतील. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचादेखील फायदा होणार आहे. यावेळी रिपाइं उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.