महाराष्ट्र गुजरातला आंदण, उद्योगांसोबतच पाणीही गुजरातला नेण्याचा मनसुबा: जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2024 12:46 PM2024-11-10T12:46:06+5:302024-11-10T12:47:34+5:30
एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : राज्यात आणि देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. दुसऱ्या बाजूने बेकारीची समस्या भेडसावत असताना नाशिकच्या महिंद्रासह राज्यातील उद्योग गुजरातला जायला लागले. उद्योगांसोबतच या भागातील पाणीही पुढच्या काळात गुजरातला नेण्याचा मनसुबा सरकारचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गिते यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. 'एकही मोठा प्रकल्प केंद्र सरकारच्या कृपेने महाराष्ट्रात आला नाही. उलट इथले प्रकल्प गुजरातला गेले आणि महाराष्ट्र अधोगतीकडे जायला लागला. सरकारने महाराष्ट्र गुजरातला आंदण दिला. पहिल्यांदा यांच्या काळात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १५ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर आले. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राचे सरकार घाबरले. एका दिवसात एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत दीडदीडशे निर्णय घ्यायला लागले. फक्त सरकार जाण्याच्या भीतीने यांनी हजारो निर्णय घेतले, असेही ते म्हणाले.
यावेळी गणेश गिते, खासदार भास्कर भगरे, श्रीराम शेटे, गजानन शेलार, नितीन भोसले, कोंडाजी आव्हाड उपस्थित होते