“रोहिणी खडसेंचा प्रचार नाही, महायुतीसाठीच काम करणार”; रक्षा खडसेंची स्पष्टोक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 08:33 AM2024-11-07T08:33:57+5:302024-11-07T08:35:00+5:30
एकनाथ खडसेंनी लोकसभेवेळी मला पाठिंबा दिला म्हणून रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी मला पाठिंबा दिला म्हणून मी रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. मी त्यांचा प्रचार करणार नाही, महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी त्यांचा प्रचार करणार नाही, महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी दिले.
भारतीय जनता पक्षाच्या मीडिया सेंटर येथे (दि. ६) आल्या असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार अमर साबळे, प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, प्रदीप पेशकर, पवन भगूरकर, राहुल कुलकर्णी, गणेश कांबळे, हेमंत शुक्ल, सोनल दगडे आदी उपस्थित होते.
त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याबाबत अधिक माहिती स्वतः एकनाथ खडसेच देऊ शकतील. मला त्यांनी लोकसभा निवडणुकीत उघड पाठिंबा दिला होता. त्यात लपून छपून काही नव्हते. मात्र, त्याबदल्यात मीदेखील विधानसभेसाठी रोहिणी यांचे काम करणार, असे होणार नाही. शिवरायांच्या स्मारकाबद्दल संजय राऊत यांचे वक्तव्य गांभिर्याने घ्यायची गरज नाही. महायुती त्यासाठी काम करते आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या आश्वासनांबाबत विचारले असता झेपतील, अशीच आश्वासने द्यायला हवीत, उगाचच सत्तेसाठी काहीही आश्वासने द्यायची आणि नंतर घुमजाव करायचे, हा त्यांच्याबाबतचा अनुभव आहे. ते म्हणतात तसे कधी झालेले नाही, असा टोलाही खडसे यानी लगावला.
नाशिकमधील बंडखोरांनी आधीच राजीनामा दिल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रश्न नसल्याचेही त्या म्हणाल्या. कांदाप्रश्न पूर्णतः सोडविण्यासाठीही केंद्रीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. काही प्रश्न सोडवण्यात आले आहेत, उरलेले लवकरच सोडवले जातील, असेही त्यांनी सांगितले.
शहरी नक्षलवादाला काँग्रेसचे प्रोत्साहन : साबळे
संविधानाबाबत भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेसचे घटनाप्रेम पुतना मावशीसारखे आहे. काँग्रेसने घटनेची कायम मोडतोड केली आहे. शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देत मोदीविरोधात वातावरण तयार करण्याचे षडयंत्र काही डाव्या संघटनांच्या मदतीने काँग्रेसने रचले आहे. भीमा कोरेगावसारख्या घटनांतून ते सिद्ध झाले आहे. दलित मुस्लीम यांच्यात भ्रम निर्माण करून फक्त मोदी यांना सत्तेवरून पाय-उतार करण्यासाठी सर्व षडयंत्र होत असल्याचा आरोप माजी खासदार अमर साबळे यांनी यावेळी केला.