पहिल्या दिवशी ८५ ज्येष्ठ मतदारांनी केले घरून मतदान; सहा दिवस चालणार प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 12:23 PM2024-11-09T12:23:24+5:302024-11-09T12:23:24+5:30
जिल्ह्यातून १८८४ ज्येष्ठ व दिव्यांगांनी घरून मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : विधानसभा निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी गृहभेट मतदानाला सुरूवात केली असून पहिल्या दिवशी ४१ ज्येष्ट मतदारांचे तर ४७ दिव्यांग मतदारांचे मतदान पार पडले. दि. १४ पर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाने घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी जिल्ह्यातून १८८४ ज्येष्ठ व दिव्यांगांनी घरून मतदान करण्यासाठी नोंदणी केली आहे.
नोंदणी केलेल्या मतदारांच्या गृह मतदानाला सुरुवात झाली असून आयोगाच्या सुचनेनुसार त्यांचे मतदान गुप्त पद्धतीने घेतले जात आहे. निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा, या दृष्टीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ८५ वर्षांवरील ज्येष्ठ व ४० टक्क्यांहून दिव्यांग असलेल्या मतदारांना गृह मतदानाची सुविधा देण्यात आली आहे. प्रशासनाकडून नोंदणी करण्यात आली असून नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पथक थेट मतदान पूर्ण करून घेत आहे. अनेक ज्येष्ट नागरिकांनी मतदान केंद्रावर येण्यास मान्यता दिल्याची माहिती टपाली मतपत्रिका जिल्हा समन्वय अधिकारी दीपमाला चौरे यांनी दिली.