मतदानासाठी केंद्र येती घरा; ४ दिवसांत १ हजार ११५ मतदारांनी केले घरून मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:58 PM2024-11-14T12:58:23+5:302024-11-14T12:58:23+5:30
त्यात १६१ दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८५ वर्षांवरील वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात २ हजार १४४ ज्येष्ठ तर २३ हजार ३४१ दिव्यांग मतदारांपैकी २ हजार ३२७ जणांचे अर्ज स्वीकारण्यात आले. आतापर्यंत १५ विधानसभा मतदारसंघात वयोवृद्ध व दिव्यांग, असे मिळून १११५ एवढ्या मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. त्यात १६१ दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघातील गृहमतदानाच्या प्रक्रियेस बुधवारी सकाळी सुरुवात झाली. भारत निवडणूक आयोगाने मतदानाची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसारच ८५ वर्षांवरील वयोवृद्ध मतदार आणि दिव्यांग (४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व) अशा मतदारांना गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत ५४ हजार ६९९ जणांना १२ 'ड' अर्जाचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी २ हजार १४४ जणांकडून प्रतिसाद मिळाला होता, तर २ हजार १३० अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. बाकीच्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यास प्राधान्य दिले आहे.
गृहमतदानाची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे मतदान केंद्रच असते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या पेट्या मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्श- नाखाली उघडल्या जातात. काही वेळेला त्यांची पहिल्यांदा मोजणी होते. तर काही वेळेला सर्व मतदान मोजल्यानंतर त्याची मोजणी केली जाते. काही ठिकाणी पोस्टल बॅलेटमुळे मतदानाचा निकाल बदलल्याचे दिसून आले आहे.
मतदानाची गुप्तता राहते कायम...
गृहमतदान प्रक्रियेचा म्हणजे एकप्रकारचे मतदान केंद्रच होय. या मतदान प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी, एक शिपाई आणि बंदोबस्ताला पोलिस असे हे पथक असते. हे पथक मतदाराच्या घरी पोहोच- ल्यानंतर त्यांना आपण कोण आहोत आणि कशासाठी आलो आहोत, याची माहिती देतात. • मतदान केंद्रावर होणाऱ्या प्रक्रियेप्रमाणेच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाते. मतदान केंद्राप्रमाणेच येथेही मतदान प्रक्रिया पूर्णपणे गोपनीय पद्धतीने पार पाडली जाते. त्यामुळे मतदानाची गुप्तता कायम राहते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपत्रिका दोन पाकिटांत बंदिस्त करून मतपेटीत टाकली जाते.