छगन भुजबळ यांची मालमत्ता ११.२० कोटींची, ८ केसेस; पत्नीच्या नावे १६ कोटींची प्रॉपर्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 07:56 AM2024-10-25T07:56:10+5:302024-10-25T07:56:17+5:30

उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात छगन भुजबळ यांनी माहिती दिली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 property of chhagan bhujbal worth 11 crore 20 lakh and 8 cases of ed | छगन भुजबळ यांची मालमत्ता ११.२० कोटींची, ८ केसेस; पत्नीच्या नावे १६ कोटींची प्रॉपर्टी

छगन भुजबळ यांची मालमत्ता ११.२० कोटींची, ८ केसेस; पत्नीच्या नावे १६ कोटींची प्रॉपर्टी

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक: राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे असलेली एकूण मालमत्ता ११ कोटी २० लाख ४१ हजार रुपयांची असून, त्यांच्यावर २४ लाख ५६ हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता १६ कोटी ५३ लाख रुपयांची असून, त्यांच्या नावावर २१ लाख १० हजार २५० रुपयांचे कर्ज आहे. सन २०१९च्या तुलनेत भुजबळ यांची मालमत्ता ९ लाख रुपयांनी वाढली आहे. छगन भुजबळ यांच्याकडील जंगम संपत्ती १ कोटी ३२ लाख ६६ हजार २३५ रुपयांची असून, स्थावर संपत्ती ३२ लाख २ हजार ४९९ रुपयांची आहे. मीना भुजबळ यांच्या नावे २ कोटी ३८ लाख २९ हजार ५२ रुपयांची जंगम, तर ८६ लाख २१ हजार ५७२ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

भुजबळ यांच्याकडे एक ट्रॅक्टर असून, त्यांच्या पत्नीच्या नावे टाटा पिकअप वाहन आहे. उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय भुजबळ यांच्याकडे ५८५ ग्रॅम सोने असून, त्याचे मूल्य ४२ लाख १२ हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नी मीनाताई यांच्याकडे ३२ लाख ७६ हजार रुपयांचे ४५५ ग्रॅम सोने, ४ लाख ३७ हजार रुपयांची ५,१५० ग्रॅम चांदी तसेच २२ लाख ५ हजार रुपयांच्या अन्य मौल्यवान वस्तू आहेत. याशिवाय भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमिनी व दोन घरे आहेत. ३ लाख रुपये भुजबळ यांनी न्यायालयामध्ये डिपॉझिट भरले आहे.

भुजबळ यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या केसेससह एकूण ८ केसेस असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांची रॅलीनंतर सभा

येवला-लासलगाव मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर एन्झोकेम शाळेच्या मैदानावर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी मराठा आरक्षणाबाबत त्यांनी स्वतंत्र आरक्षणाची जी मागणी शरद पवार यांची आहे, तीच भूमिका आपलीही असल्याचे सांगितले,

दरम्यान, अर्ज दाखल केला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक पराक्रमसिंह जडेजा, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते प्रचार प्रमुख अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सोनाली राजे पवार आदी उपस्थित होते.

नितीन पवारांवर, ९० लाखांचे कर्ज

 कळवण-सुरगाणा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार यांचे वर्ष २०२४-२५ चे उत्पन्न ६५ लाख २८ हजार रुपये नमूद केले असून स्थावर व जंगम मालमत्ता १० कोटी ८ लाख ३ हजार ७२६ रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे २ कोटी २५ लाख ६८ हजार ३२७ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. त्यांच्यावर ९० लाख ३० हजार ३५८ रुपयांचे वित्तीय संस्थांचे कर्ज आहे.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 property of chhagan bhujbal worth 11 crore 20 lakh and 8 cases of ed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.