समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीच्या ३ जागा धोक्यात! शिंदे-पवार गट आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2024 09:43 AM2024-11-01T09:43:53+5:302024-11-01T09:45:04+5:30
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवाराविरुद्ध केलेल्या बंडखोरीनंतर महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात असून, आता प्रत्यक्ष माघारीने शेवट गोड होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच शिंदेसेनेकडून दोन उमेदवारांना अनपेक्षितपणे पक्षाचे एबी फॉर्म देण्यात आल्याने जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शिंदेसेना आमने-सामने आले आहेत. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवाराविरुद्ध केलेल्या बंडखोरीनंतर महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात असून, आता प्रत्यक्ष माघारीने शेवट गोड होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघापैकी अजित पवार गट ७, भाजप ५ आणि शिंदेसेना ४ जागांवर निवडणूक लढवत आहे. यामध्ये दिंडोरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ विरुद्ध शिंदेसेनेचे धनराज महाले, तर देवळालीत अजित पवार गटाच्या सरोज अहिरे विरुद्ध शिंदेसेनेच्या राजश्री अहिरराव आमने- सामने आहेत. नांदगावमध्ये शिंदेसेनेचे सुहास कांदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बंडखोर समीर भुजबळ यांच्यात बिग फाइट होणार आहेच; परंतु कांदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने येवल्यात छगन भुजबळ यांची कोंडी करण्यासाठी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न असल्याने येवल्यातदेखील चुरस निर्माण होणार असल्याचे दिसते. जिल्ह्यात भाजपला एका ठिकाणी तर शिंदे-पवार गटाला तीन ठिकाणी बंडखोरी थोपविण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे.
...तर तिसरा एबी फॉर्मही असता
नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने अगदी अखेरच्या दिवशी शिंदेसे- नेकडून नाशिक जिल्ह्यातील तीन उमेदवारांसाठी एबी फॉर्म पाठविण्यात आल्याचे सांगितले जाते. दिंडोरी आणि देवळालीत अजित पवार गटाच्या विरोधात शिंदे सेनेने एबी फॉर्म दिले. तिसरा फॉर्म हा इगतपुरी मतदार- संघासाठी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासाठी असल्याची चर्चा होती. शिंदे सेनेने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधात उमेदवार दिला असता, या छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.