सुधाकर बडगुजर यांना विधानसभेत पाठवा; आदित्य ठाकरे यांचा महिलांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 12:28 PM2024-11-09T12:28:06+5:302024-11-09T12:28:28+5:30
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सतत कार्यरत राहणारे सुधाकर बडगुजर यांना आता विधानसभेत पाठवण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
नाशिक : महिलांसाठी लाडकी बहीण योजना पुरेशी आहे काय, आणखी काय हवे, असा प्रश्न करीत उद्धवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी थेट महिलांमध्ये जाऊनच संवाद साधला. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सतत कार्यरत राहणारे सुधाकर बडगुजर यांना आता विधानसभेत पाठवण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.
नाशिक पश्चिम मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारासाठी पवननगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना दुप्पट पैसे देणार असून, महिलांसाठी खास पोलिस स्टेशन निर्माण करण्यात येतील, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ठाकरे यांची देवळाली येथेही सभा झाली. यावेळी खा. राजाभाऊ वाजे, खा. शोभा बच्छाव, डॉ. डी. एल. कराड यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर डॉ. अपूर्व हिरे, वसंत गिते, उपनेते सुनील बागुल, विनायक पांडे, लक्ष्मण जायभावे आदी उपस्थित होते.
महिलांसाठी मोठा प्रकल्प आणणार
यावेळी उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी या मतदारसंघात महिलांसाठी मोठा प्रकल्प आणणार असल्याचे सांगितले. सिडकोतील घरे फ्री होल्ड करणार तसेच मतदारसंघातील सर्व तारा भूमिगत करणार असल्याचे ते म्हणाले.
... तर बर्फाच्या लादीवर झोपवू
नांदगाव : नांदगाव मतदारसंघात लोकप्रतिनिधीकडून गुंडागर्दी सुरू असल्याचा आरोप करत आमच्या कार्यकर्त्यांना हात लावाल तर याद राखा, बर्फाच्या लादीवर झोपवेल, असा दम शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी नांदगाव तालुक्यातील निमगाव येथील जाहीर सभेत शिंदेसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता दिला.