देवळालीत तूर्तास शिंदे सेनेचे पदाधिकारी राहणार तटस्थ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2024 09:39 AM2024-11-06T09:39:10+5:302024-11-06T09:40:36+5:30
मेळाव्यात निर्णय, राजश्री अहिराव यांची अनुपस्थिति
लोकमत न्यूज नेटवर्क, देवळाली कॅम्प: देवळाली मतदार संघात शिंदे सेनेचा ए बी फार्म माघारी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्यानंतरही शिवसेनेचे धनुष्यबाण आणि पक्षाच्या उमेदवाराचे नाव कायम आहे. त्यामुळे आता शिंदे सेनेसमोरच पेच निर्माण झाला असून प्रचार करावा की नाही अशी व्दीधा स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि. ५) मतदारसंघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली त्यात धनुष्यबाण चिन्ह कायम असल्याने निवडणूक लढविण्याची मागणी करण्यात आली. अर्थात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश येईपर्यंत दोन दिवस तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्षाचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत माहिती दिली.
देवळाली मतदार संघात ऐनवेळी आलेल्या एबी फॉर्ममुळे शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) या महायुतीच्याच दोन मित्रपक्षांमध्ये जोरदार लढाई होण्याची शक्यता असून मतदारसंघात कोणती लाडकी बहीण निवडून येणार याची उत्सुकता आहे. विहीतगाव येथील साई ग्रॅन्ड लॉन्समध्ये शिंदे सेनेची याच संदर्भात मंगळवारी (दि.५) बैठक घेण्यात आली. यावेळी मंचावर सहसंपर्कप्रमुख प्रवीण तिदमे, सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, जिल्हा संघटक योगेश म्हस्के, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, सचिन मानकर, उपजिल्हाप्रमुख शिवाजी भोर, सुनील गायधनी, धर्मवीर आध्यत्मिक सेनेचे प्रदेश सहअध्यक्ष नीलेश गाढवे, प्रमोद लासूरे, सुदाम ढेमसे, आर.डी. धोंगडे, युवा सेना जिल्हाप्रमुख सदानंद नवले, संजय तुंगार, मामा ठाकरे, वैशाली दाणी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
नांदगावमध्ये समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत वादाला प्रारंभ झाल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. देवळालीत पक्षाच्या आदेशानुसार राजश्री अहिरराव यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी पक्षाने नंतर एबी फार्म मागे घेतला परंतु प्रत्यक्षात उमेदवार आणि पक्ष चिन्ह कायम असल्याने दोन दिवस पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात ते बघावे मगच कामकाजाला सुरुवात करावी म्हणजे दोन दिवस तटस्थ राहण्याची सूचना माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केली.
यावेळी सदानंद नवले यांनी बोलताना सांगितले की, भाऊबीजेच्या भेट म्हणून मुख्यमंत्र्यांना ही जागा निवडून द्या, संजय तुंगार यांनी सांगितले की, देवळाली शिवसेनेचा बालेकिल्ला असून मनामनात धनुष्यबाण निशाणी असून त्यामुळेच निवडणूक लढवावी, अशी मागणी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते शशीभाऊ उन्हवणे यांनी केली. प्रास्ताविक तालुकाप्रमुख लकी ढोकणे यांनी तर आभार पावन कहांडळ यांनी मानले.
मिसळ जिलेबी पार्टी...
लोकसभा निवडणूकी नंतर शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करतांना "दोन्ही आप्पांचा फोटो "फलकावर होता. या मेळाव्यास उपस्थितांसाठी तरींची मिसळ अन् जिलेबी ठेवली होती उपस्थितांमध्ये मात्र पक्षाची एबी फॉर्म, चिन्ह मिळवूनही उमेदवार राजश्री अहिरराव अनुपस्थित असल्याने याबाबत उलटसुलट चर्चा होती.
मी शिंदे सेनेचीच उमेदवार : अहिरराव
माझे नाव आणि पक्षचिन्ह कायम आहे. शिंदे सेनेचे नेते माझ्या संपर्कात असून प्रचाराचा आढावा देखील घेत आहेत, त्यामुळे मी शिंदे सेनेचीच अधिकृत उमेदवार आहे, असा दावा राजश्री अहिरराव यांनी केला आहे. 'लोकमत'शी बोलताना त्यांनी आपण पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (दि.५) कोल्हापूरला असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मंगळवारी विहीत गाव येथील मेळाव्यास मी स्वतःहून जाणे टाळले. कारण माझ्या उपस्थितीत समर्थन करण्यासाठी प्रभाव पडला असता. परंतु आता मात्र तसे झालेले नाही. मी धनुष्यबाणाची जबाबदारी घेतली आहे, त्याची प्रतिष्ठा मतदारसंघात टिकवायची असल्याचे मी पक्ष नेत्यांना सांगितले आहे, असेही त्या म्हणाल्या.