ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार कल्याणराव पाटील अजितदादांच्या राष्ट्रवादीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2024 08:11 AM2024-10-24T08:11:32+5:302024-10-24T08:14:04+5:30
विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे कल्याणराव पाटील यांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, लासलगाव : येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी बुधवारी (दि.२३) राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत पाटील यांनी घड्याळ हाती बांधले.
लासलगाव-येवला मतदारसंघातून कल्याणराव पाटील हे १९९५ व १९९९ मध्ये दोन टर्म शिवसेनेचे आमदार होते. त्यांनी अंबादास बनकर व नरेंद्र दराडे यांचा पराभव केला होता. मात्र, २००४ च्या निवडणुकीत त्यांची हॅट्ट्रिक छगन भुजबळ यांनी हुकवली होती. आजवर भुजबळ विरोधक म्हणूनच त्यांनी भूमिका निभावली.
आता मात्र बदलत्या समीकरणात त्यांनी उद्धवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे म्हटले आहे. यावेळी आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आपणास मुंबई येथे बोलावून चर्चा केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मतदारसंघाच्या विकासासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. - कल्याणराव पाटील, माजी आमदार