...तर समीर भुजबळ घड्याळ चिन्हावर लढले असते: छगन भुजबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 09:50 AM2024-10-31T09:50:02+5:302024-10-31T09:50:40+5:30
नाशिकसाठी तब्बल तीन एबी फॉर्म अचानकपणे आल्याचा केला दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : समीर भुजबळ यांनी नांदगावमधून दाखल केलेली उमेदवारी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी केली. ही आमची नैतीकता आहे. अन्यथा समीरने घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली असती असा दावा अजित पवार गटाचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी केला.
बुधवारी (दि.३०) नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी हा दावा केला. नाशिकमध्ये शिंदेसेनेने पाठविलेल्या हेलिकॉप्टरने दिंडोरी, देवळाली आणि इगतपुरी असे एकूण तीन एबी फॉर्म आले होते. मात्र, इगतपुरी येथील काशीनाथ मेंगाळ यांनी मनसेतर्फे उमेदवारी अर्जासह एबी फॉर्म दाखल केलेला होता. अन्यथा शिंदेसेनेचा तिसरा एबी फॉर्म त्यांना मिळाला असता, असेही भुजबळ यांनी सांगितले.
समीर यांनी राजीनामा देऊन त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. आम्हालादेखील घड्याळ निशाणी घेता आली असती; मात्र समीर यांनी नीतिमूल्ये पाळत अपक्ष अर्ज दाखल केला. नाशिकसह राज्यातही काही ठिकाणी महायुतीचे दोन-दोन उमेदवार उभे असून बघूयात पुढे काय होते ते, असेही भुजबळ म्हणाले.
दोन वर्षापूर्वीच शरद पवारांना कल्पना
सिंचन घोटाळाप्रकरणी फाइलवर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या स्वाक्षऱ्या होत्या आणि या प्रकरणात होत असलेल्या घडामोडींबाबत अजित पवार यांनी दोन वर्षापूर्वीच शरद पवारांना माहिती दिली होती, असा दावा आमदार छगन भुजबळ यांनी केला. अजित पवार यांनी केलेला आरोप नवा नाही. त्यासंदर्भात त्यांनी शरद पवारांशी चर्चाही केली होती. मात्र, ती बाहेर आली नव्हती. पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्या संदर्भात दुजोरा दिला आहे. ते मुख्यमंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती असू शकेल, असेही भुजबळ यांनी सांगितले.
जरांगे फॅक्टर दिसत नाही
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मला जिथून बोलावणे येईल, तिथे मी प्रचारासाठी जाईन. निवडणुकीत जरांगे फॅक्टर दिसून येत नाही, असेही भुजबळ म्हणाले. तर येवल्यात पदाधिकारी, कार्यकर्तेच प्रचार करीत आहेत. ते मला तिकडे येऊदेखील देत नसल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले.