'नाशिक मध्य' मतदारसंघात दुरंगी लढत; भागनिहाय मताधिक्यावर ठरू शकतो कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2024 09:40 AM2024-11-05T09:40:40+5:302024-11-05T09:40:46+5:30

थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन तसेच दिल्लीतून पक्ष निरीक्षकांनी घरी येऊन केलेला पाठपुरावा तसेच मविआचे उमेदवार वसंत गीते यांनी घरी येऊन केलेल्या मनधरणीनंतर डॉ. हेमलता पाटील यांनी अत्यंत नाराजीने माघार घेतल्याने नाशिक मध्यची तिरंगी लढत दुरंगी झाली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 tough fight in nashik central constituency | 'नाशिक मध्य' मतदारसंघात दुरंगी लढत; भागनिहाय मताधिक्यावर ठरू शकतो कल

'नाशिक मध्य' मतदारसंघात दुरंगी लढत; भागनिहाय मताधिक्यावर ठरू शकतो कल

नाशिक : माघारीच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे नाशिक मध्य मतदारसंघातील समीकरणांमध्ये झालेल्या बदलांनी या मतदारसंघातील लढत दुरंगीच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गीते यांच्यात २०१४ नंतर अर्थात १० वर्षांनंतर पुन्हा थेट सामना रंगणार असल्याने ही लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

मविआकडून जागावाटपात शहरामध्ये काँग्रेसला एकही जागा न मिळाल्याने काँग्रेसच्या इच्छुकांनी अखेरपर्यंत प्रयत्न करूनही ही जागा उद्धवसेनेच्याच वाट्याला गेली. त्यामुळे गतवेळच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. हेमलता पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केल्याने नाशिक मध्यची लढत जिल्ह्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती. मात्र, थेट काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा फोन तसेच दिल्लीतून पक्ष निरीक्षकांनी घरी येऊन केलेला पाठपुरावा तसेच मविआचे उमेदवार वसंत गीते यांनीदेखील घरी येऊन केलेल्या मनधरणीनंतर डॉ. हेमलता पाटील यांनी अत्यंत नाराजीने माघार घेतल्याने नाशिक मध्यची तिरंगी लढत दुरंगी झाली आहे. नाशिक मध्य मतदारसंघात मनसेचे उमेदवार अंकुश पवार आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी माघार घेतल्याने महायुतीच्या उमेदवार फरांदे यांच्या मतांमधील फाटाफूट टळली आहे. तर हनीफ बशीर आणि गुलजार कोकणी यांच्या माघारीमुळे आघाडीला लाभ होण्याची शक्यता आहे.

भागनिहाय मताधिक्यावर ठरू शकतो कल

लोकसभेच्या निकालात नाशिक मध्य मतदारसंघातून मविआच्या उमेदवाराला आघाडी मिळाल्यापासून मविआच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या काळात राज्य शासनाकडून लाडकी बहीणसह आणलेल्या अन्य योजनांमुळे लोकसभेप्रमाणेच चित्र राहण्याची शक्यता दुरावली आहे. मात्र, त्या परिस्थितीतही गंगापूररोड, कॉलेजरोड, इंदिरानगरचा भाग एकीकडे आणि दुसरीकडे जुने नाशिक, भाभानगर, वडाळा या भागापैकी कोणत्या भागात अधिक मतदान करून घेण्यात उमेदवार यशस्वी होतात, त्यावर निवडणुकीचा कल निश्चित होऊ शकतो.

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 tough fight in nashik central constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.