महायुतीच्या निकालावर मतभेदांचा परिणाम नाही: अनुराग ठाकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 12:21 PM2024-11-17T12:21:49+5:302024-11-17T12:23:10+5:30
नाशिकमध्ये मांडली भूमिका
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: इंग्रज गेले आणि फोडा आणि सत्ता काबीज करा हे सूत्र काँग्रेस पक्षाला देऊन गेले. मात्र पंतप्रधानांच्या काळात सब का साथ, सब का विकास सूत्र यावर सरकारची वाटचाल सुरू आहे. 'बटेंगे तो कटेंगे' यावर पक्षात असलेल्या काही वरिष्ठ नेत्यांचा सूर वेगळा असला तरी विचारभेदाचा परिणाम महायुतीच्या निकालावर होणार नसल्याचे स्पष्ट संकेत माध्यमांशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.
भारतीय जनता पार्टीचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी पक्षाच्या मीडिया सेंटर येथे शनिवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. यावेळी लक्ष्मण सावजी, सुनील बच्छाव, प्रशांत जाधव, राहुल कुलकर्णी, गणेश कांबळे, सुहास शुक्ल उपस्थित होते.
ठाकूर पुढे म्हणाले की, जे देशाच्या ध्रुवीकरणाचे स्वप्न पाहत आहेत, त्या काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सरकारला प्रत्युत्तर म्हणून एक है तो सेफ है असे सांगणे गैर नाही. आमच्या पक्षासह मित्रपक्षाच्या नेत्यांना मत मांडायचे असेल तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार बहाल केला आहे. त्यांच्या त्या विधानाचा भविष्यात राज्यातल्या महायुतीच्या निकालावर परिणाम होणार नसून नाशिकच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद केली जाईल. सिंहस्थ कुंभमेळा काळात प्रस्तावित निओ मेट्रो ट्रेनसह गोदा पार्क प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही यावेळी ठाकूर यांनी दिली.