केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी टाळला वीर सावरकरांच्या 'भारतरत्न'चा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2024 02:02 PM2024-11-11T14:02:08+5:302024-11-11T14:04:16+5:30
काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत दिले असताना नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना सावरकरांना भारतरत्न केव्हा? असे विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. याबाबत आता बोलणे योग्य नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री भारती पवार, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, गणेश कांबळे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. ते म्हणाले, संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेत काँग्रेसने भारतीय नागरिकांची फसवणूक केली आहे. एकीकडे संविधानाबाबत खोटा कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये संविधान लागू करण्यास विरोध करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, ही काँग्रेसची दुहेरी नीती लोकांना समजायला लागली आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
नाशिकमधून प्रकल्प पळवले जात आहेत, हादेखील फेक नरेटिव्ह आहे. देशातील प्रत्येक भागाचा विकास व्हायला हवा. एचएएलमध्ये विमानाचे सुटे भाग बनवण्याला मान्यता मिळाली तेव्हा त्याला विरोध करणारे आज नाशिकच्या विकासाचा जाब विचारत आहेत. पालघरला प्रकल्प आला तर नाशिकचा विकास होणार, पर्यायाने राज्याचा आणि देशाचाही विकास होणार, त्यामुळे त्यात राजकारण करणे चांगले नाही. उद्धवसेनेची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारापेक्षा वेगळी आहे. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी, मणिशंकर अय्यर यांना उद्धवसेना साथ देते हे न पटण्यासारखे आहे, असेही रिजिजू म्हणाले.