आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2024 08:18 AM2024-11-07T08:18:39+5:302024-11-07T08:22:07+5:30

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

maharashtra assembly vidhan sabha election 2024 vanchit bahujan aghadi contest election on the basis of reservation issue and 10 candidates in nashik district | आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात

आरक्षणाच्या मुद्द्यावर वंचित आघाडी मैदानात; नाशिक जिल्ह्यात १० मतदारसंघांत उमेदवार रिंगणात

नाशिक: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असल्याने याच मुद्यावर वंचित बहुजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. आरक्षणाचा फॉर्म्युला वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असल्याचा दावा करीत वंचितने जिल्ह्यातील दहा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत.

नाशिक शहरातील देवळाली, नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या चारही मतदारसंघात वंचितचे उमेदवार आहेत. देवळालील अविनाश शिंदे, नाशिक पूर्व मध्ये रवींद्र कुमार पगारे, नाशिक मध्य मध्ये मुशीर सय्यद आणि नाशिक पश्चिम मध्ये अमोल चंद्रमोरे असे उमेदवार मैदानात आहेत. चांदवड मतदारसंघात संतोष केदारे, दिंडोरीत प्रा. योगेश भुसार, नांदगावला आनंद शिंगारे, इगतपुरीत भाऊसाहबे डगळे, बागलाणमध्ये राजेंद्र चौरे, तर मालेगाव बाह्य मतदारसंघात किरण मगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

नाशिक मध्य या मतदारसंघात काँग्रेसमधून वंचितकडे आलेले मुशीर सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितच्या उमेदवारांना मिळणाऱ्या मतांचा थेट परिणाम महाविकास आघाडी आणि महायुती उमेदवारांच्या मतांच्या गणितावर होत असल्याचा आरोप दरवेळी केला जातो त्यामळे यंदादेखील वंचितच्या उमेदवारांचा फटका इतर पक्षांच्या उमेदवारांना बसणार का? याबाबतची चाचपणी युती आणि आघाडीच्या उमेदवारांकडून केली जात आहे. वंचितने दहा ठिकाणी उमेदवार उभे केले असून वंचितकडे आरक्षणाचा मुद्दा असल्याने त्यांना कितपत यश मिळेल, हे येत्या २३ तारखेलाच कळणार आहे.

बच्चू कडूंच्या प्रहारचे तीन उमेदवार

परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्ह्यात तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. पाच जागांवर चाचपणी केल्यानंतर निफाड, चांदवड आणि बागलाण मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात आले. शेतकरी, दिव्यांग आणि शिक्षणाच्या मुद्यावर बच्चू कडू यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले असून निफाडमधून आमदार सुहास कांदे यांचे बंधू गुरुदेव कांदे प्रहारकडून लढत आहेत. चांदवड मतदारसंघातून गणेश निंबाळकर, तर बागलाण मतदारसंघातून जयश्री गरुड या प्रहारच्या उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत प्रहारकडून एकही जागा जिल्ह्यात लढविण्यात आलेली नव्हती. यंदा परिवर्तन महाशक्ती संघटनेच्या माध्यमातून प्रहारने तीन उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी बच्चू कडू जिल्ह्यात सभा घेणार आहेत.

शेतकऱ्यांचे प्रश्न, अनुदानाचा मुद्या, शिक्षणाची अवस्था, दिव्यांगाच्या सुविधा अशा मुद्यांवर निवडणूक लढवीत आहे. यंदा प्रथमच तीन उमेवार जिल्ह्यातून देण्यात आलेले आहेत. दिव्यांगांचा निधी, आणि लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक लाभ दिला; मात्र तेलाचे दर वाढवून काढूनही घेतले हा मुद्दा घेऊन मतदारांपर्यंत पोहोचणार आहोत. - अनिल भडांगे, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना.

केवळ मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी नव्हे, तर यंदा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आरक्षणाचा फॉर्म्युला आमचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडेच असून, आरक्षणवादी जनतेचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. आरक्षण आणि संविधान बचावाची आमची मोहीम आहे. - चेतन गांगुर्डे, राज्य सदस्य, वंचित बहुजन आघाडी
 

Web Title: maharashtra assembly vidhan sabha election 2024 vanchit bahujan aghadi contest election on the basis of reservation issue and 10 candidates in nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.