कोणत्या पवारांची पॉवर ठरेल निर्णायक? NCPचे दोन्ही गट भिडणार; काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 09:22 AM2024-10-28T09:22:12+5:302024-10-28T09:22:52+5:30
पुढील काही दिवस मोठी राजकीय घुसळण बघायला मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाल्याने मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट तीन ठिकाणी आमने- सामने येणार असून, या तीनही लढती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासाठी अस्तित्वाची लढाई असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठीही प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. त्यामुळे या लढतींकडे विशेषत्वाने सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
जिल्ह्यात महायुतीने १५ जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्वाधिक ७ जागा लढवणार आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपल्या ५ जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर प्रथमच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने येत आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी दोन्ही पवार गट आपापसात भिडणार आहेत. त्यात सर्वांत लक्षवेधी लढत येवला मतदारसंघाची असणार आहे.
येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार व मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षफुटीनंतर येवल्यात झालेल्या जाहीर सभेत खुद्द शरद पवार यांनी येवलेकरांची जाहीर माफी मागत आपला निर्णय चुकल्याचे सांगितले होते. त्यामुळे यंदा भुजबळांसमोर शरद पवार यांच्याकडून कोणता सक्षम उमेदवार दिला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्याच पारड्यात उमेदवारी टाकत भुजबळांसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे.
दिंडोरी-पेठ मतदारसंघातूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांची उमेदवारीसाठी निवड केली आहे. याठिकाणीही झिरवाळ यांच्यापुढे आव्हान उभे करण्यात आले आहे.
तर सिन्नर मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोर उद्धवसेनेतून आलेल्या उदय सांगळे या युवा नेत्याला उमेदवारी देत लढत प्रतिष्ठेची बनवली आहे.
कोणत्या पवारांची पॉवर ठरणार निर्णायक ?
राष्ट्रवादीचे दोन्ही गट तीन ठिकाणी आमने-सामने येणार असल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच हा सामना रंगणार आहे. त्यामुळे कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार असून, पुढील काही दिवस या मतदारसंघात मोठी राजकीय घुसळण बघायला मिळणार आहे.