महाराष्ट्र चेंबरतर्फे जीएसटी प्रशिक्षणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 12:34 AM2018-02-14T00:34:33+5:302018-02-14T00:41:37+5:30
नाशिक : महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर आणि एमएसएमई-डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटीसंबंधी व्यवस्थापन विकास प्रशिक्षण कार्यक्र मास पद्मश्री बाबुभाई राठी सभागृह, सारडा संकुल येथे सुरुवात झाली आहे. चेंबरतर्फे १२ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी ४ ते सायंकाळी ६.३० या वेळेत सलग पाच दिवस हा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू राहणार आहे.
या प्रशिक्षण कार्यक्र माच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कुठलाही नवीन कर लागू होण्याआधी व झाल्यानंतर सुरुवातीला संभ्रम असतो. व्हॅटबाबतही सुरुवातीला असेच वातावरण होते. जीएसटी कर नवीन आहे. यातील बदल आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठी जीएसटीसंबंधीच्या सूचना नियमित अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे आपले जीएसटीविषयीचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचा सर्वांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी एमएसएमईचे समन्वयक गिरीश दिवाण यांनी प्रशिक्षण कार्यक्र मात जीएसटी कायदा आणि त्याचे फायदे या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात डिफरन्स टाईप आॅफ ट्रान्झक्शन्स अॅण्ड कोड (एचएसएन, एसएसी आदी), इनपुट टॅक्स के्र डिट सिस्टिम, रेग्युलर स्कीम, कम्पोझिशन स्कीम आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी चेंबरचे सचिव चंद्रकांत दीक्षित, प्रशिक्षक स्वाती पाटील, चेतन बंब, सोनल दगडे, सुनीता फाल्गुने, अंजू सिंघल, सचिन जाधव, अमित अलई, माधवराव भणगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमांगी दांडेकर यांनी केले.