७० दिवसांच्या मोटारसायकलवारीतून महाराष्ट्र दर्शन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 02:02 AM2021-04-10T02:02:34+5:302021-04-10T02:04:20+5:30
माणूस देश-विदेशात भ्रमंती करण्याचे स्वप्न बघतो, परंतु आपण ज्या राज्यात जन्मलो ते जवळून बघण्याचा विचारही कधी मनाला शिवत नाही. नेमक्या याच विचारापासून प्रेरणा घेऊन नाशिक येथील एका युवा रायडरने अवघ्या ७० दिवसात मोटारसायकलीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन ९९३० किलोमीटरचा पल्ला गाठत महाराष्ट्र राइडची स्वप्नपूर्ती केली.
नाशिक : माणूस देश-विदेशात भ्रमंती करण्याचे स्वप्न बघतो, परंतु आपण ज्या राज्यात जन्मलो ते जवळून बघण्याचा विचारही कधी मनाला शिवत नाही. नेमक्या याच विचारापासून प्रेरणा घेऊन नाशिक येथील एका युवा रायडरने अवघ्या ७० दिवसात मोटारसायकलीद्वारे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन ९९३० किलोमीटरचा पल्ला गाठत महाराष्ट्र राइडची स्वप्नपूर्ती केली.
बालपणापासून भ्रमंतीची गोडी असणाऱ्या नाशिक येथील कमलेश बाफना या युवकाने दि. २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आडगाव येथून दुचाकीने महाराष्ट्र भ्रमण यात्रेला आरंभ केला. सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात करीत सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्यातील विविध स्थळांना भेट दिली, त्यानंतर धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, बीड़, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, ठाणे, मुंबई, पालघर असा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा प्रवास करीत दि. ५ एप्रिल रोजी नाशिक येथील अशोकस्तंभाजवळ या यात्रेची सांगता केली.
या यात्रेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास जवळून जाणून घेतला. शंभराहून अधिक प्राचीन व ऐतिहासिक मंदिरे तसेच काही दुर्मिळ आणि अपरिचित असलेल्या १५० ते २०० पर्यटन स्थळांना भेटी दिल्या. यापूर्वी कमलेश यांनी २०१७ साली देशातील स्वर्णिम चतुर्भुज महामार्गाने ६८०० किलोमीटरचा प्रवास १३ दिवसात पूर्ण केला असून याचवर्षी जम्मू आणि काश्मीर येथील चेनानी नाशरी या आशियातील सर्वात लांब टनेलमध्ये सर्वप्रथम मोटारसायकल चालविण्याचा मानही त्यांनी मिळविला आहे. या ७० दिवसांत ९९३० किलोमीटरचा प्रवास करीत ३६ जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा तसेच मोटारसायकलीने सर्वाधिक अंतराचा पल्ला गाठणारे ते पहिले मानकरी ठरले आहेत. या यात्रेदरम्यान बारा तासात प्रतिदिन सरासरी १५० किलोमीटरचा प्रवास केला.