Maharashtra Election 2019: महायुतीच्या प्रचारात सेनेचा हात आखडता; भाजप उमेदवार चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 01:02 AM2019-10-11T01:02:19+5:302019-10-11T01:02:41+5:30
नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत.
नाशिक : भाजपा आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी शहरातील मतदारसंघात शिवसेनेचा सहभाग जेमतेमच दिसत असून, त्यामुळे भाजप उमेदवार हवालदिल झाले आहेत. नाशिक पश्चिममध्ये तर शिवसेना बंडखोराचा प्रचार हा शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार, असा सुरू असून त्यामुळे युती होऊनही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक शहरात एकूण चार मतदारसंघ असून, त्यापैकी देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहेत, तर नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य मतदारसंघ भाजपकडे आहेत. महापालिकेतील संख्याबळाच्या आधारे नाशिक पश्चिम मतदारसंघ तरी भाजपकडून शिवसेनेला हवा होता. त्यामुळे त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली, परंतु वरिष्ठ नेत्यांनी जागावाटप करताच उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पश्चिममध्ये सर्व इच्छुक आणि नगरसेवकांनीदेखील एकत्र येऊन सेनेचा उमेदवार उभा करण्याचे ठरविले. त्यानंतर बंडखोरी करण्यात आली. आता बंडखोराचा प्रचार थेट शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार असा सुरू आहे, तर दुसरीकडे अन्य मतदारसंघातदेखील शिवसेनेचा हात अखडता आहे. युती होऊनदेखील शिवसेनेचा प्रतिसाद यथातथाच आहे. त्यातच अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून निवडून आलेले खासदार हेमंत गोडसे यांचा सहभाग नसून त्यामुळेदेखील भाजपात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभेतही तोच अनुभव
लोकसभा निवडणुकीत खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतरदेखील शिवसेनेच्या काही गटांची नाराजी होती. त्यावेळी भाजप कायकर्तेच कसून कामाला लागले होते. त्यानंतर विधानसभेत जागावाटपात अनेक जण इच्छुक होते, परंतु जागावाटप जाहीर झाले नाही आणि शिवसेनेचे उमेदवार नसल्याने कार्यकर्ते प्रचारात रस घेत नसल्याचे दिसत आहे.