Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोरांवरील कारवाईकडे उमेदवारांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:15 AM2019-10-10T04:15:58+5:302019-10-10T04:20:01+5:30
दोन्ही पक्षांकडून अद्यापही या बंडखोरांना थंड करण्याचे अथवा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या बंडखोरांना पक्षांतर्गत फूस असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाच्या विरोधात भाजप व सेनेच्या बंडखोरांनी उघडउघड स्वत:चा प्रचार चालविल्याने महायुतीच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. दोन्ही पक्षांकडून अद्यापही या बंडखोरांना थंड करण्याचे अथवा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या बंडखोरांना पक्षांतर्गत फूस असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या बंडखोरांसमवेत पक्षाचे पदाधिकारीही उघडपणे प्रचारात सहभागी होत असल्याने त्याचा मनस्ताप पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला होत आहे.
नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत युती व आघाडीच्या जागावाटप सन २००९ च्या निवडणुकीप्रमाणे झाले असून, शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम ठेवली तर भाजपने नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारी वगळता अन्य तिघा आमदारांना रिंगणात उतरविले आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनेक इच्छुक असतानाही ही जागा भाजपला सुटल्यामुळे सेनेचे इच्छुक नाराज झाले. त्यातील नगरसेवक विलास श्ािंदे यांनी अपक्ष उमेदवारी करून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यापुढे अडचण निर्माण केली आहे. शिंदे यांच्या माघारीसाठी पक्षाकडून प्रयत्न केले गेले तरी, त्याला शिंदे यांनी दाद दिली नसल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन सेनेच्या २२ नगरसेवकांनी केले असून, त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी सर्व नगरसेवकांनी हजेरी लावून शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे उघडउघड दाखवून दिले आहे.
मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असताना सेनेच्या नगरसेवकांनी तिकडे पाठ फिरवून शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ वाढविल्याची बाब भाजपत अस्वस्थता निर्माण झाली आहे. असाच प्रकार नांदगाव मतदारसंघात झाला असून, नांदगावची जागा सेनेच्या वाट्याची आहे हे माहिती असूनही भाजपच्या जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव मतदारसंघात कामाला लागल्या होत्या. मात्र जागा सेनेला सुटल्याचे पाहूनही त्यांनी व पती रत्नाकर पवार या दोघांनीही नामांकन दाखल केले.
माघारीच्या दिवशी मनीषा पवार यांनी माघार घेतली असली तरी रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी केली आहे. खुद्द मनीषा पवार यांनी आपला अर्ज मागे घेताना पक्षाबरोबर राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र शिवसेनेविषयी त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.
तिकीट कटले तरी मैदानात
आघाडीने २००९ च्या उमेदवारांना कायम ठेवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांचा उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झाला. त्यातील काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेतली तर काहींनी बंडाचे अस्त्र उगारले आहे.