Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:05 AM2019-10-10T04:05:57+5:302019-10-10T04:10:01+5:30

गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही.

Maharashtra Election 2019: Will Bhujbal get sympathy or will Mahayuti change? | Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

Maharashtra Election 2019 : भुजबळांना सहानुभूती मिळणार की महायुती परिवर्तन घडविणार?

Next

धनंजय वाखारे

नाशिक - जिल्ह्यातील येवला मतदारसंघात सलग चौथ्यांदा उमेदवारी करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर पुन्हा एकदा शिवसेनेचे संभाजी पवार यांचे आव्हान आहे. निवडणूक रिंगणात एकूण ८ उमेदवार असले तरी खरी लढत भुजबळ-पवार यांच्यातच रंगणार आहे.

भुजबळ यांनी आपल्या कामाच्या झपाट्याने गेल्या १५ वर्षांत मतदारसंघावर मांड घट्ट केलेली असल्याने यंदाही त्यांची नौका विधानभवनाच्या किनाऱ्याला लागेल, असे चित्र दिसत असले तरी, अधून-मधून डोकावणारे विरोधाचे खडक त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळेच गेल्या तीन टर्ममध्ये सहज वाटणारी निवडणूक यंदा त्यांना तितकीशी सोपी राहिलेली नाही.

येवला नगरपालिकेवर भाजपचा नगराध्यक्ष आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर सेनेचे वर्चस्व असले तरी आत्मकेंद्रित राजकारणामुळे युतीतील नेत्यांमध्ये फारसे सख्य नाही. शिवाय, ईडीमुळे तुंरुगवास भोगावा लागल्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न भुजबळ समर्थकांकडून होत आहे. सरकारने सुडबुद्धीने कारवाई केली, असा त्यांचा आरोप आहे.

जमेच्या बाजू

छगन भुजबळ - सलग तीन टर्म नेतृत्व करताना छगन भुजबळ यांनी मतदारसंघाला विकासाची दाखविलेली दिशा. नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात पुणेगाव-दरसवाडी योजनेद्वारे पाणी कातरणी परिसरापर्यंत आणून ठेवल्याने सुमारे ४० खेड्यांना मिळालेला दिलासा. पैठणी क्लस्टर, तात्या टोपे स्मारक, मुक्तिभूमी स्मारक यापासून ते क्रीडासंकुलापर्यंत निर्माण केलेली स्थायी स्वरूपाची कामे.

संभाजी पवार - मागील निवडणुकीतही शिवसेनेकडून उमेदवारी करताना दुसऱ्या क्रमांकाची सुमारे ३४ टक्के घेतलेली मते. संघटन कौशल्यामुळे कार्यकर्त्यांचे आवतीभवती असणारे मोहोळ. पंचायत समिती, मजूर फेडरेशन आणि स्वत:च्या शैक्षणिक संस्थेचे जिल्हाभर पसरलेले जाळे यामुळे जनमानसाला परिचित असलेला चेहरा. चुलते माजी आमदार मारोतराव पवार यांचा लाभलेला राजकीय वारसा. विविध कामांसाठी वैयक्तिक पुढाकार.

उणे बाजू

छगन भुजबळ - आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदी कार्यरत असताना दाखविलेली विकासाची गती गेल्या पाच वर्षांत मंदावली. त्यामुळे काही प्रमाणात नाराजीचा सूर. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात २६ महिने तुरुंगवारीमुळे जनमानसात निर्माण झालेले संशयाचे मळभ. गेल्या पाच वर्षांत कमी झालेला लोकसंपर्क. जवळचे म्हणविले जाणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा. निवडणूकपूर्व पक्षांतराच्या चर्चांमुळे पक्षनिष्ठेबाबत कार्यकर्त्यांमध्ये असलेला संशयकल्लोळ.

संभाजी पवार - प्रभावी कार्यकर्ता म्हणून ओळख असली तरी वक्तृत्वशैलीचा अभाव. मागील निवडणुकीत पराभूत होऊनही यंदा पुन्हा शिवसेनेने उमेदवारी पदरात टाकल्याने पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये उमटलेला नाराजीचा सूर. या सुप्त विरोधामुळे त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता. शिवसेनेच्याच स्थानिक दोघा (विधान परिषदेतील) आमदारांचे कितपत सहकार्य मिळेल याबाबत साशंकता. भुजबळांबाबत ज्येष्ठ शिवसैनिकांमध्येही असलेली सहानुभूती.

 

Web Title: Maharashtra Election 2019: Will Bhujbal get sympathy or will Mahayuti change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.