Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:57 PM2024-11-01T18:57:37+5:302024-11-01T18:58:09+5:30
छोटे पक्ष, अपक्षांचे मतदान नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, देवळालीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल ठरविणार आहे, असेच चित्र या तीन मतदारसंघात दिसत आहे.
धनंजय रिसोडकर, नाशिक
Maharashtra Election 2024: विधानसभेसाठी महानगरातील चारही जागांवर महायुती आणि मविआने तुल्यबळ उमेदवार दिल्याने प्रत्येक जागेवर लढत अत्यंत अटीतटीची होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यात नाशिक पूर्व मतदारसंघातच केवळ दोन प्रमुख उमेदवारांमध्ये काट्याची लढत होणार आहे. मात्र, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि देवळाली मतदारसंघातील लढती या तिरंगी किंवा चौरंगी होण्याची शक्यता सध्या दिसून येत आहे.
या तीन मतदारसंघांमध्ये तर छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना होणारे मतदान हे त्या जागेचा निकाल फिरविण्यासही कारणीभूत ठरू शकते, असे सध्याचे चित्र आहे. चारही मतदारसंघांमध्ये उभ्या असलेल्या प्रमुख उमेदवारांना छोटे पक्ष आणि काही अपक्षांची क्षमता ज्ञात असल्याने तसेच निवडणूक अत्यंत अटीतटीच्या २ ते ५ हजारांच्या मताधिक्यावर निश्चित होणार असण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच महायुती आणि मविआच्या उमेदवारांकडून काही अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मिनतवाऱ्या करून त्यांच्या माघारीसाठी सर्व 'अर्था'ने प्रयास सुरू झाले आहेत. स्थानिक स्तरावर प्रयत्न यशस्वी न झाल्यास संबंधित पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचून मनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारी माघारीच्या अखेरच्या टप्प्यात चारपैकी किमान दोन मतदारसंघांमध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्यास कुणालाही आश्चर्य वाटू नये. तसेच बंडखोरांबाबत राज्यस्तरावरुन मध्यस्थी न झाल्यास त्याचा परिणाम उमेदवारांच्या विरोधात निकाल जाणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ
भाजपने विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेलेले भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गीते यांच्याकडून थेट आव्हान राहणार आहे.
राष्ट्रवादीने गत निवडणुकीप्रमाणेच भाजपचाच पदाधिकारी फोडून टाकलेलाच डाव पुन्हा नव्याने टाकला असला तरी यावेळी मतदारांची विभागणी केवळ पक्षीयच नव्हे तर जातीय समीकरणांवरही अधिक मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
त्यामुळे जातीय गणितांची बेरीज, वजाबाकी आणि समीकरणांचा ताळमेळ ज्याला अधिक चांगल्या प्रकारे 'मॅनेज करता येईल, आर्थिक त्यालाच या मतदारसंघात विजय मिळविणे शक्य होणार आहे. त्यात मनसे नेते राज ठाकरे यांनी नुकताच भाजपकडील कल स्पष्ट केल्याने या मतदारसंघातील मनसे उमेदवाराची भूमिका काय राहणार? त्यावरदेखील काही मतांची दिशा ठरू शकणार आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ
महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे पक्षांतर्गत विरोध होऊनदेखील पक्षश्रेष्ठींनी विश्वास यांना दाखविल्याने त्यांना मविआतर्फे उद्धवसेनेकडून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे आव्हान राहणार आहे.
त्यात हिरे यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या दिनकर पाटील यांनी बुधवारीच भाजपमधून मनसेत पक्षांतर करीत उमेदवारीदेखील पटकावली आहे.
तर मविआचा घटकपक्ष असल्याने माकपाने शरद पवार यांची भेट घेऊनही कोणताच निर्णय झाला नसल्याने डॉ. डी. एल. कराड यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता तसेच स्वराज्य पक्षाकडून दशरथ पाटीलदेखील रणांगणात उतरले असल्याने नाशिक पश्चिमची लढत किमान चौरंगी ते पंचरंगी होण्याची चिन्हे आहेत.
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ
महायुतीमधील भाजपच्या आमदार देवयानी फरांदे विरुद्ध मविआकडून उद्धवसेनेचे माजी आमदार वसंत गीते यांची १० वर्षांनंतर पुन्हा लढत होत आहे.
मात्र, मविआने काँग्रेसची जागा हिसकावल्याने संतप्त झालेल्या डॉ. हेमलता पाटील यांनी अपक्ष म्हणून लढत देण्याचा निर्धार कायम राखला असल्याने ही लडत निश्चितपणे तिरंगी होणार आहे. गत काही वर्षांमध्ये झालेले राजकीय, सामाजिक बदल तसेच जातीय समीकरणांचे नवीन संदर्भही त्याला आहेत.
तसेच या मतदारसंघात मनसेकडून जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने ते कुणाची मते घेतात ते महत्त्वाचे ठरेल. विजेत्या उमेदवाराचे मताधिक्य अत्यल्प राहण्याची चिन्हे पाहता कोणता उमेदवार कुठल्या प्रमुख उमेदवाराची किती मते खातो? त्यावर 'नाशिक मध्यचा कल निश्चित होण्याची शक्यता आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघ
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्याविरोधात उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या योगेश घोलप अशीच गत वर्षाप्रमाणेच लढत होण्याची शक्यता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या पाच मिनिटांपर्यंत होती.
मात्र, शिंदेसेनेने अचानकपणे राजश्री अहीरराव यांनादेखील एबी फॉर्म देत रणांगणात उतरवल्याने ही लढत किमान तिरंगी होण्याची चिन्हे नाकारता येत नाहीत.
त्याशिवाय अपक्ष उमेदवारी केलेले लक्ष्मण मंडाले, वंचित बहुजन आघाडी तसेच अन्य काही अपक्षांकडून अर्ज माघारीपर्यंत काय निर्णय घेतले जातात, तसेच अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी महायुतीमध्ये वरिष्ठ स्तरावर काय निर्णय होणार? त्यावर या मतदारसंघातील कल स्पष्ट होऊ शकणार आहे.