महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:41 AM2017-11-28T00:41:56+5:302017-11-28T00:44:59+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येते. अंतिम मतदार यादी, नामनिर्देशन पत्राचा नमुना, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या सूचना आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती कुलुगरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येते. अंतिम मतदार यादी, नामनिर्देशन पत्राचा नमुना, उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या सूचना आदी माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती कुलुगरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली. विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा प्राध्यापक, विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील एक याप्रमाणे पाच शिक्षकांकरिता निवडणूक घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषदेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्या शाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची विद्याशाखानिहाय निवडणूक घेण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखा महिला, तर दंत विद्याशाखा अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता सोडतीद्वारे आरक्षित आहे. निवडणुकीसाठी उमेदवाराला दहा वर्ष शिक्षकपदाचा अनुभव असणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. नामनिर्देशनाला गुरुवार, दि. ३0 रोजी प्रारंभ होणार आहे. नामनिर्देशनाकरिता सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत नामनिर्देशन केले जाणार आहे. अंतिम तारीख ७ डिसेंबर आहे. अर्जाची छाननी दि. ११ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. माघारीची मुदत २० पर्यंत छाननीनंतर उमेदवारांच्या वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत दि. २0 डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी दि. २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. निवडणूक दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वेळेत विविध मतदान केंद्रांवर राबविण्यात येणार आहे मतमोजणी दि. ३0 डिसेंबर रोजी विद्यापीठ मुख्यालयात होणार आहे. मतमोजणीनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.