महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मनपाकडून ३ लाखांचे बक्षीस जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 02:27 PM2020-01-21T14:27:32+5:302020-01-21T14:43:40+5:30
सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली.
नाशिक : ‘केसरी’ किताब पटकाविणारा कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर यांची नाशिक महापालिका ‘ब्रॅन्ड अॅम्बेसेडर’पदी निवड करण्यात आली आहे. तसेच मंगळवारी (दि.२१) पार पडलेल्या महासभेत सदगीर यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मनपाच्या वतीने येत्या २८ तारखेला महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिककरांकडून नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मनपाने त्यांना ३ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे.
हर्षवर्धन सदगीर हे मुळच्या अकोले तालुक्यातील रहिवासी आहे; मात्र त्यांनी कुस्तीचे धडे नाशिकच्या भगूर गावातील बलकवडे व्यायामशाळेत गिरविले. येथील मातीत कुस्तीचा सराव करत सदगीर यांनी विविध स्पर्धांमध्ये बाजी मारली. पुणे येथे झालेल्या कुस्तीच्या स्पर्धेत सदगीर यांनी लातूरच्या पहिलवानाचा पराभव करत महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला. सदगीर यांना मनपाचे ब्रॅन्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड करावी आणि त्यांचा अभिनंदनाचा ठरावास स्थायी समितीकडून यापुर्वीच मान्यता देण्यात आली होती. महापौर सतिश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी एक समितीही गठित करण्यात आली आहे.
दरम्यान, महासभेत अभिनंदनाचा ठराव पारित होत असताना सभागृहातील नगरसेवकांनी सदगीर यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्याच्या सूचनेबरोबरच ३ लाख रूपये रोख रक्कम, चांदीची गदा भेट देऊन आॅलिम्पिकसाठी सदगीर यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, यासारख्या सुचनाही मांडल्या. तसेच नागरिकांनाही मदतीचे आवाहन करावे आणि नागरी सत्कार सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्याची सुचनाही यावेळी पुढे आली. महासभेने प्रस्तावास मंजुरी दिली.