Nashik: नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहील, पालकमंत्री दादा भुसे यांचा दावा
By संकेत शुक्ला | Published: May 1, 2024 12:50 PM2024-05-01T12:50:31+5:302024-05-01T12:51:25+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेची जागा परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेकडेच राहणार असून दुपारपर्यंत ती बातमी नाशिककरांना समजेल असे स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
- संकेत शुक्ल
नाशिक - नाशिक लोकसभेची जागा परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेकडेच राहणार असून दुपारपर्यंत ती बातमी नाशिककरांना समजेल असे स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
महाराष्ट्र दिनानिमित्त नाशिकच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते म्हणाले की काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे नाशिकच्या उमेदवाराची घोषणा करतील. नाशिक लोकसभा कार्यक्षेत्रात महायुतीची ताकद मोठी आहे त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाला तरी त्याचा फटका अजिबात बसणार नाही, संध्याकाळपर्यंत आमचा उमेदवार घराघरात पोहोचलेला असेल. शांतिगिरी महाराज यांच्याबद्दल विचारले असता त्यांना या संदर्भात कोणीही शब्द दिलेला नाही. लोकशाहीमध्ये अर्ज कुणीही भरू शकतो मात्र एबी फॉर्म प्रत्येकाला दिला जात नाही. त्यामुळे काही वेळातच त्याबाबत चित्र स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांना डोळ्यासमोर ठेवूनच खासदार निवडून द्यायचा असल्याने तो कोण असेल याकडे न बघता महायुती एकत्रित काम करेल. भुजबळांनी माघार घेतल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की भुजबळ आमचे नेते आहेत नाशिक लोकसभेसाठी तेच नेतृत्व करणार आहेत त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चेत तथ्य नाही.